वाजपेयींच्या अस्थी कलशांचे गोव्यात आगमन

0
128

>> आज व उद्या उत्तर आणि दक्षिण गोव्यात अस्थिकलश दर्शन

>> उद्या मांडवी व झुवारीत होणार विसर्जन

भारताचे दिवंगत माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांचे अस्थिकलश घेऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांचे दाबोळी विमानतळावर काल संध्याकाळी ६ वाजता आगमन झाले. आज व उद्या उत्तर आणि दक्षिण गोव्यात अस्थिकलश दर्शन यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शुक्रवार २४ रोजी संध्याकाळी ६ वाजता पणजी कॅप्टन ऑफ पोर्ट जेटीजवळ उत्तर गोव्यात फिरवलेल्या अस्थींचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते मांडवी नदीत विसर्जन करण्यात येईल. त्याच दिवशी दक्षिण गोव्यात फिरवलेल्या अस्थींचे कुठ्ठाळी फेरी धक्क्यावर झुवारी नदीत सायंकाळी ६ वा. खासदार नरेंद्र सावईकर यांच्या हस्ते विसर्जन करण्यात येणार आहे.

काल स्व. वाजपेयी यांचे अस्थिकलश गोव्यात आणणार याची चाहूल समस्त गोमंतकीयांना लागली होती. त्यामुळे दाबोळी विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांनी व इतर लोकांनी एकच गर्दी केली होती. संध्याकाळी ५ वा. अस्थिकलश दाबोळी विमानतळावर आणण्यात येईल हे समजताच संध्या. ४ वाजल्यापासूनच भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी दाबोळी विमानतळावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

अस्थिकलश मिरवणूक काढण्यासाठी वाहन फुलांनी सजवून ठेवण्यात आले होते. दाबोळी विमानतळा व्यतिरिक्त राष्ट्रीय महामार्गावर मोक्याच्या ठिकाणी पोलिस तैनात ठेवण्यात आले होते. तसेच सांकवाळ मुख्य नाक्यावरही पोलीस मोठ्या प्रमाणात हजर होते. तसेच भाजप कार्यकर्तेही स्वागतासाठी सज्ज होते.
दरम्यान, बरोबर ६ वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर अस्थिकलश घेऊन विमानतळा बाहेर आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देऊन दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहिली. अस्थिकलश गाडीवर ठेवून झाल्यानंतर मिरवणूकीला प्रारंभ झाला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाचसे मीटर अंतर पायी चालत जाऊन मिरवणुकीत सहभाग घेतला.
यावेळी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, दक्षिण गोवा खासदार नरेंद्र सावईकर, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, मुरगावचे आमदार मिलिंद नाईक, कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा, सभापती प्रमोद सावंत, भाजप सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, माजी आमदार दामू नाईक, मुरगाव नगरपालिका उपनगराध्यक्ष शशिकांत परब, नगरसेवक नंददीप राऊत, श्रीधर म्हार्दोळकर, रिमा सोनुर्लेकर, माजी नगराध्यक्ष दीपक नाईक, पिळर्ण उपसरपंच कमलाप्रसाद यादव, चिखली माजी सरपंच निलिमा नाईक व इतर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिखली पंचायतीजवळ अस्थी कलशाचे जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी बोलताना सांगितले की, वाजपेयींसारखा नेता मिळणे म्हणजे आमचे गोवेकरांचे मोठे भाग्य. कारण अटलजींना गोवेकरांबद्दल सदैव आपुलकी होती. गोवेकरांवर त्यांचे अफाट प्रेम होते. गोव्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले होते.

पर्रीकर अमेरिकेहून परतले

स्वादूपिंडासंबंधीच्या आजारावर उपचार घेण्यासाठी परत एकदा अमेरिकेला गेलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे काल संध्याकाळी गोव्यात परतले. मुख्यमंत्र्याचे काल संध्याकाळी ५ वा. अमेरिकेहून मुंबईत आगमन झाले आणि नंतर तेथून गोव्याकडे येणार्‍या विमानाने ६ वा. त्यांचे गोव्यात आगमन झाले.

दरम्यान, भारताचे दिवंगत प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांचे अस्थिकलश आणण्यासाठी नवी दिल्लीला गेलेले खासदार विनय तेंडुलकर व खासदार नरेंद्र सावईकर यांचे संध्याकाळी ५.३० वा. नवी दिल्लीतून दाबोळी विमानतळावर आगमन झाले. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हेही यावेळी त्यांच्याबरोबर होते. पर्रीकर यांचे विमान ६ वा. दाबोळी येथे पोचणार असल्याची माहिती मिळाल्याने वरील मंडळी कलशासह पर्रीकर यांची वाट पाहत तेथे थांबली. पर्रीकर यांचे ६ वा. विमानतळावर आगमन झाल्यावर सर्वजण अस्थी कलशांसह विमानतळावरून बाहेर पडले. दुसर्‍या टप्प्यातील उपचारानंतर काल त्यांचे गोव्यात आगमन झाले.

अटलबिहारी वाजपेयी यांचे देहावसान झाले तेव्हा पर्रीकर हे अमेरिकेला होते. त्यामुळे त्यांना वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेता आले नव्हते. तसेच अंत्यसंस्कारालाही हजर राहता आले नव्हते. मात्र, योगायोगाने काल वाजपेयी यांच्या अस्थी कलशांचे गोव्यात आगमन झाले त्याचवेळी पर्रीकर हे गोव्यात पोचले.

आजच्या दर्शन यात्रेचे वेळापत्रक
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश उत्तर गोव्यात गुरूवारी सकाळी ८.४५ वाजता – पणजी, सकाळी ९.३० वाजता – पर्वरी, साळगाव पीडीए कॉलनी प्रवेशद्वार, १० वाजता – कळंगुट पोलीस स्टेशनजवळ, १०.४५ वाजता – शिवोली गणेश मंदिराजवळ, १२ वाजता – मांद्रे पंचायत कार्यालयाजवळ, दुपारी २.१० वाजता – पेडणे जुना बसस्थानक, संध्याकाळी ४.३० वाजता – म्हापसा टॅक्सी स्टॅण्ड, संध्याकाळी ६.३० वाजता – थिवी कदंब बसस्थानक अस्नोडा येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

तसेच दक्षिण गोव्यात सकाळी ८.३० वाजता – काणकोण कदंब बसस्थानक, सकाळी १०.३० वाजता – कुंकळ्ळी नगरपालिका सभागृहाजवळ, ११.३० वाजता – केपे बाजार जुन्या मासळी मार्केटजवळ, दुपारी १२.३० वाजता – सांगे बसस्थानक, दुपारी १.३० वाजता – कुडचडे सुडा मार्केटजवळ, संध्याकाळी ३.३० वाजता – सावर्डे कोडली तिस्क, संध्याकाळी ५ वाजता – शिरोडा बाजार आणि संध्याकाळी ६.३० वाजता – फोंडा नगरपालिका उद्यानाजवळ दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.