वाघुर्मेत सापडला युवतीचा मृतदेह

0
29

>> म्हादई नदीतील झुडपात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

फोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या वाघुर्मे येथील महादई नदीकाठच्या झाडीत लटकलेल्या अवस्थेत अज्ञात युवतीचा मृतदेह सापडला. हा खून आहे की आत्महत्या असा संसय व्यक्त होत असून पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. हा मृतदेह गुरुवारी संध्याकाळी उशिरा सापडला. निळी जीन्स पँट व पट्‌ट्यांचा टी शर्ट अंगावर असलेल्या एका युवतीचा हा मृतदेह आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे चेहरा ओळखण्याच्या पलीकडे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघुर्मे येथे म्हादई नदीच्या किनार्‍यावरील झुडपात हा मृतदेह लटकलेला होता. संध्याकाळी येथील काही लोक मासेमारीसाठी गेले असता त्यांना दुर्गंधी आली. त्यामुळे त्यांनी शोध घेतला असता झुडपात अडकलेला मृतदेह त्यांना दिसला. त्यानंतर लगेच फोंडा पोलिसांना त्यांनी याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पुढील तपासणीसाठी बांबोळी इस्पितळात पाठवून देण्यात आला आहे.

मृतदेह पाच ते सात दिवसांचा असावा असा कयास वर्तवण्यात येत आहे. फोंडा तसेच लगतच्या पोलीस स्थानकाच्या हद्दीत एखादी युवती बेपत्ता असल्याची तक्रारही नोंद झालेली नाही. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

विद्यार्थिनी असण्याचा संशय
पेहरावावरून सदर युवती विद्यार्थिनी असावी असाही संशय व्यक्त केला जात आहे. या युवतीने आत्महत्या केली की तिचा घातपात केला याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मयत युवतीचे वय अंदाजे वीस ते बावीस वर्षांचे आहे.