इफ्फीतील क्रिएटिव्ह माइंड चित्रपटांसाठी ज्युरींची घोषणा

0
27

चित्रपट क्षेत्रात भव्य दिव्य व नवे प्रयोग करू पाहणार्‍या तरुण रक्ताला वाव देण्याच्या उद्देशाने यंदाच्या इफ्फीत सर्जनशील अशा नव्या दमाच्या ७५ चित्रपटकर्मींकडून क्रिएटिव्ह माईंड योजनेखाली इफ्फीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. या अर्ज केलेल्या चित्रपटकर्मींमधून ७५ सर्वोत्कृष्ट अशा चित्रपटकर्मींची निवड करण्यासाठी ग्रँण्ड ज्युरी व सिलेक्शन ज्युरीची निवड काल करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नव्या दमाच्या ७५ नव्या चित्रपटकर्मींचा शोध घेण्यासाठी हे अर्ज मागवण्यात आले होते.

ग्रॅण्ड ज्युरीमध्ये सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष असलेले सुप्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक केतन मेहता, सुप्रसिद्ध संगीतकार व पार्श्‍वगायक शंकर महादेवन्, ख्यातनाम चित्रपट अभिनेते मनोज वाजपेयी, ऑस्कर पुरस्कार विजेते ध्वनिसंकलक रसूल पुक्कुटी व चित्रपट निर्माते दिग्दर्शक विपुल अमृतलाल शहा यांचा समावेश आहे. सिलेक्शन ज्युरीमध्ये अभिनेत्री व निर्मात्या वाणी त्रिपाठी, राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट लेखक अनंत विजय, चित्रपट समीक्षक यतींद्र मिश्रा, राष्ट्रीय पुरस्कार विजेते फिल्म मेकर संजय पुरन सिंह व अभिनेते संजय खेडेकर यांचा समावेश आहे. वरील योजनेची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी गेल्या २२ ऑक्टोबर रोजी केली होती.

चार चित्रपटांची अट मागे ः फळदेसाई
इफ्फीत गोव्याच्या चित्रपटांचा विशेष विभाग स्थापन करण्यासाठीकमीत कमी चार चित्रपटांचीजी अट होती ती काढून टाकण्यात आली असल्याची माहिती काल ईएसजीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी दिली.

या विभागासाठी चारपेक्षा जास्त चित्रपट आले तरच ह्या विभागाची स्थापना करण्याचा निर्णय आम्ही पूर्वी घेतला होता. परंतु आता आम्ही सदर निर्णय बदलला असून आता ती चार चित्रपटांची अट काढून टाकली असल्याची माहिती फळदेसाई यांनी दिली.

इफ्फीसाठी आता २८०० प्रतिनिधींनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी २५५० जणांनी त्यासाठी शुल्क भरले आहे. यंदा आम्ही पाच हजार प्रतिनिधींची अपेक्षा करत असल्याचे फळदेसाई म्हणाले.