वागातोरमध्ये रेव्ह पार्टीवर छापा, ४ जणांना अटक

0
151

>> ९ लाखांचे अमली पदार्थ जप्त

गोवा पोलिसांच्या रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण विभागाने वागातोर येथे एका रेव्ह पार्टीवर शनिवारी रात्री छापा टाकून २३ जणांना ताब्यात घेतले असून नऊ लाखांचे अमलीपदार्थ जप्त केले.
कोरोना महामारीच्या काळात उत्तर गोव्यातील किनारी भागात काही ठिकाणी रेव्ह पार्ट्या होत असल्याच्या तक्रारी असून या रेव्ह पार्टीच्या संबंधीच्या बातम्याही वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या आहेत.

हणजूण येथे रेव्ह पार्टी होणार अशी माहिती खबर्‍याकडून मिळाल्यानंतर रेव्ह पार्टीवर छापा घालण्यासाठी गुन्हा अन्वेषण विभागाची तीन पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी नियोजित पद्धतीने छापा टाकून २३ जणांना ताब्यात घेऊन ९ लाखांचे अमलीपदार्थ हस्तगत केले आहे. या रेव्ह पार्टीमध्ये तीन विदेशी महिला सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कोकेन, चरस, एक्स्टासी गोळ्या, एमडीएमए या सारखे अमलीपदार्थ आढळून आले आहेत. लॉकडाऊन नियमांचा भंग, अमलीपदार्थ या प्रकरणी संबंधिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सक्सेना यांनी दिली.

गृहमंत्रिपद लोबोंकडे
द्या ः पालयेकर
राज्यासाठी पूर्णवेळ गृहमंत्र्याची गरज असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गृहखात्याला न्याय देऊ शकत नाहीत. मायकल लोबोंसारख्या नेत्याकडे गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्याची गरज असल्याचे आमदार तथा माजी मंत्री विनोद पालयेकर यांनी म्हटले आहे.

चौघांना पोलीस कोठडी
दरम्यान, गुन्हा अन्वेषण विभागाने रेव्ह पार्टीप्रकरणी अटक केलेल्यांपैकी चार जणांना ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश म्हापसा येथील न्यायालयाने काल दिला आहे. या प्रकरणी कलाकार कपिल झवेरी (४० वर्षे, मुंबई), इव्हा ओव्हा (२९ वर्षे झेक रिपब्लिक), ऍना नुकामेंडी (२८ वर्षे, मेक्सिको), एलिना इमिलीनोव्हा (२६, रशिया) यांना कोठडी देण्यात आली आहे.