राज्यात संततधार पाऊस

0
163

>> एकूण १२२ इंचांची नोंद

राज्याला संततधार पावसाने मागील दोन दिवस झोडपून काढले असून राज्यातील विविध भागात पडझडीच्या घटनांची नोंद झाली आहे. सोमवार १७ पासून पावसाचे प्रमाण थोडे कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मागील चोवीस तासांत सुमारे ३.७७ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत १२२ इंच पावसाची नोंद झाली असून पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा २७ टक्के जास्त आहे.

जोरदार पावसाने चार दिवसांच्या उसंतीनंतर पुन्हा एकदा राज्याला झोडपून काढले. मागील चोवीस तासांत उत्तर गोव्यात सरासरी ४.८८ इंच आणि दक्षिण गोव्यात २.८३ इंच पावसाची नोंद झाली आहे. म्हापसा येथे सर्वाधिक ५.८६ इंच पावसाची नोंद झाली आहे.
चोवीस तासांत उत्तर गोव्यात जोरदार पाऊस कोसळला. पेडणे येथे ५.२६ इंच, साखळी येथे ५.०३ इंच, फोंडा येथे ५.२६ इंच, ओल्ड गोवा येथे ४.९५ इंच, काणकोण येथे १.१८ इंच, दाबोळी येथे ३.५१ इंच, मडगाव येथे १.९१ इंच, मुरगाव येथे ३.७७ इंच, केपे येथे ३.१४ इंच, सांगे येथे ३.३२ इंच पावसाची नोंद झाली आहे.

राजधानी पणजीमध्ये मागील ३३ तासांत ६.०७ इंच पावसाची नोंद झाली आहे. पणजीत चोवीस तासांत ४.२५ इंच पावसाची नोंद झाली. तसेच, रविवारी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० यावेळेत १.८१ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर, मुरगाव रविवारी नऊ तासांत १.१४ इंच पावसाची नोंद झाली आहे.

पेडण्यात दीड शतक
राज्यातील सर्वाधिक पावसाची आत्तापर्यंत पेडणे तालुक्यात नोंद झाली आहे. पेडण्यात मोसमी पावसाची आत्तापर्यंत १४९.१६ इंच एवढी नोंद झाली आहे.

साखळी येथे १३४.७३ इंच, ओल्ड गोवा येथे १३१ इंच, केपे येथे १२८.६६ इंच, फोंडा येथे १२६.३३ इंच, काणकोण येथे १२५.८८ इंच, सांगे येथे १२३.१० इंच, पणजी येथे ११६.८१ इंच, मुरगाव येथे १०७.५९ इंच, दाभोळी येथे १०६.८२ इंच, मडगाव येथे १०३.७५ इंच पावसाची नोंद झाली आहे. वाळपई आणि म्हापसा येथील पावसाची माहिती उपलब्ध झालेली नाही.