राज्यातील विविध खाणींवर व सरकारी जमिनीत असलेल्या सुमारे ३ दशलक्ष टन लोहखनिजाचा ई-लिलाव मंगळवार दि. १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा खनिज माल कित्येक वर्षे खाणींवर व सरकारी जमिनींवर पडून आहे. यापैकी काही खनिजाचा सरकारने यापूर्वी ई लिलाव केलेला आहे.
पाळी, कोठंबी, शेळपे, वागूस, मायणा, मुगुडी, कुळे, रिवण, शिरगाव, तोळे आदी विविध खाणींवर तसेच सरकारी जमिनीत उत्खनन करून काढलेले हे लोहखनिज सध्या आहे. दि. १० नोव्हेंबर रोजी होणार्या २४ व्या ई लिलावात राज्याचे खाण खाते या खनिजाचा लिलाव करणार आहे. मेटल स्क्रॅप ट्रेडिंग कार्पोरेशनतर्फे हा ई-लिलाव करण्यात येणार आहे.
गेल्या मे महिन्यात २३ वा तर ऑगस्ट २०१९ मध्ये २२ वा ई-लिलाव झाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१४ ला ई-लिलाव प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र नंतर २१ व्या ई लिलावानंतर मे २०१७ मध्ये ही प्रक्रिया थांबवण्यात आली.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लोहखनिजाचे दर अत्यंत खाली उतरल्याने बोलीदारांकडून मागणी येईनाशी झाल्याने ही प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती.