आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गोव्यातील समस्यांवर आवाज उठवून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देऊन गोव्याच्या जनतेचा आवाज बनावे, असे आवाहन आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पदाधिकाऱ्याच्या बैठकीत बोलताना काल केले.
अरविंद केजरीवाल हे तीन दिवसांच्या गोवा भेटीवर आले आहेत. त्यांनी काल राज्यातील आपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
गोव्याचा खरा आवाज बनण्यासाठी संघटनेला बळकटी देण्याची गरज आहे. आमची ताकद नेहमीच लोकांशी असलेले आमचे नाते राहिले आहे. तळागाळातील संघटना मजबूत करा आणि गोव्याचा आवाज बना. लोकांच्या समस्या ऐका, त्यांना मुद्दे मांडण्यास मदत करा आणि त्या समस्या सुटतील याची खात्री करा. लोकांना मदत करणे आणि त्यांचे काम पूर्ण करणे हा राजकारणाचा खरा उद्देश आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले.
या बैठकीत केजरीवाल यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या सूचना जाणून घेतल्या. तसेच, राज्यात आपची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी त्यांचे दृष्टिकोन मांडले. आपच्या नेत्यांनी जमीन रूपांतरे, खाजन जमिनींचा नाश आणि तलाव आणि नद्यांचे नुकसान यासंबंधी गंभीर चिंता व्यक्त केली. अनियंत्रित विकास पर्यावरण आणि उपजीविकेला कसे हानी पोहोचवत आहे यावर प्रकाश टाकला.