लोकसभेत रालोआला 400 पेक्षा अधिक जागा

0
21

>> खासदार सदानंद तानावडे यांचा दावा

येत्या लोकसभा निवडणुकीत 543 जागांपैकी 400 वर जागा भाजप व त्यांच्या सहकारी पक्षांना मिळतील, असा दावा काल गोव्याचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला. या निवडणुकीत उत्तर तसेच दक्षिण गोवा या दोन्ही मतदारसंघांत पक्षाचा बहुमताने विजय होईल, असे मतही तानावडे यांनी यावेळी पुढे बोलताना व्यक्त केले.

गोव्यातील उमेदवारांची निवड कधी केली जाईल, असे विचारले असता लोकसभा निवडणुकीसंबंधीची अधिसूचना काढण्यात आल्यानंतर पक्ष आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाचे संसदीय मंडळ योग्य चर्चेनंतर उमेदवारी कुणाला द्यायची त्याचा निर्णय घेईल व नंतर ह्या उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असे त्यांनी पुढे बोलताना नमूद केले.
उत्तर गोव्यातून एका बिगर राजकीय व्यक्तीला उमेदवारी देण्याबाबत भाजप विचार करीत आहे हे किती खरे आहे, असे विचारले असता त्यात तथ्य नसल्याचे ते म्हणाले. उमेदवारीचा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेईल, असे त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.

जानेवारी राष्ट्रीय मंडळाची बैठक
दि. 22 आणि 23 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली. दि. 22 रोजी झालेल्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. तर दि. 23 रोजी झालेल्या बैठकीला गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित होते. या बैठकीत पक्षाची हल्लीच झालेली विकसित भारत संकल्प यात्रा, तसेच पक्षाने जिल्हा पंचायत व पंचायत सदस्य, नगरसेवक यांना प्रशिक्षण देण्यासाठी देशभरात घेतलेली प्रशिक्षण शिबिरे यावर चर्चा झाली. जानेवारी महिन्यात पक्षाच्या राष्ट्रीय मंडळाची बैठक होणार आहे. त्याशिवाय पक्षाच्या आमदारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम होणार असून त्यावरही सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे तानावडे यांनी स्पष्ट केले. हल्लीच राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ तेलंगणमध्ये झालेल्या निवडणूक निकालासंबंधीही चर्चा झाली. आता राज्याराज्यात पक्ष संघटना बळकट करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही तानावडे यांनी दिली. पत्रकार परिषदेला मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट व पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर हे हजर होते.