राज्य मंत्रिमंडळाच्या आज बुधवारी सकाळी होणार्या बैठकीत लॉकडाऊन नंतरच्या राज्याच्या वाटचालीबाबत मंत्र्यांच्या सूचना जाणून घेतल्या जाणार आहेत. चर्चेनंतर महत्वपूर्ण सूचना केंद्राला सादर केल्या जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
गोवा विद्यापीठाच्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जाणार आहेत. गोवा विद्यापीठाकडून परीक्षा आणि पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन केले जाणार आहे. गोवा विद्यापीठाचे कुलगुरू, अधिकारी व इतरांशी विद्यापीठ परीक्षेच्या विषयावर चर्चा करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
कोविड-१९ अर्तंगत नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्य करणार्या पोलीस कर्मचार्यांना विमा कवच उपलब्ध करून दिले जाणार आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिक घराबाहेर पडू नयेत म्हणून पोलीस विविध माध्यमातून प्रयत्न करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत झाला आहे. जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याची तक्रार नाही. जीवनावश्यक वस्तूची जास्त दराने विक्री करणार्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारी अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.
परदेशात बोटीवर असलेल्या खलाशांना परत आणण्याचा देशपातळीवरील विषय असून केंद्र सरकारकडून योग्य निर्णय घेतला जाणार आहे. गोव्याबरोबर विविध राज्यातील खलाशीसुद्धा परदेशात आहेत. गोव्यातील खलाशांना आणण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती करण्यात आली आहे. खलाशांना गोव्यात आणल्यानंतर त्यांना क्वारंटाईऩ करून ठेवण्यासाठी व्यवस्थेवर विचार केला जात आहे. गोव्यातील परदेशातील जहाजांवर असलेल्या खलाशांच्या माहितीचे संकलन करण्यासाठी नोडल अधिकार्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मंत्री फिलीप नेरी रॉड्रीगीस व इतर आमदारांशी विदेशात असलेल्या खलाशांच्या प्रश्नावर चर्चा केली आहे. खलाशांचा प्रश्नावर तोडगा काढण्याबाबत गोवा सरकार सकारात्मक आहे, असेही सावंत यांनी सांगितले.
वाढीव दराने मासळी विक्री
करणार्यांवर कारवाई होणार
मासळीची विक्री करण्यास मान्यता देण्यात आल्यानंतर वाढीव दराने मासळीची विक्री करण्यात येत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आल्या आहेत. काही जणांकडून साठवून ठेवलेली मासळी चढ्या दराने विकली जात आहे. वाढीव दराने मासळी विकणार्यावर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला.
सरकारची आर्थिक स्थिती
चांगली नाही
लॉक डाऊनच्या काळात सर्वांना आर्थिक फटका बसला आहे. राज्य सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने सरकारकडून आर्थिक मदतीची कुणीही अपेक्षा करू नये. योग्य वेळी काही जणांना मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्य आर्थिक पुनरुज्जीवन समितीची दोन दिवसांत घोषणा केली जाणार आहे, असेही सावंत यांनी सांगितले.
राज्यातील सहकारी पतसंस्था सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्रालयाकडून मान्यता दिली जात नाही. समुद्रात मच्छीमारीसाठी असलेल्या बोटीना धक्क्यावर येण्यास मान्यता देण्यासाठी केंद्राकडून परवानगीसाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील ७ कोरोना प्रॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सर्व कोरोना लागण झालेले रुग्ण आजारातून निश्चितच बरे होतील. गोमेकॉच्या प्रयोगशाळेत काल करण्यात आलेल्या नमुन्यांचे अहवाल नकारात्मक आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.