>> सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्ङ्गरन्सिंगद्वारे संवाद
देशभरात कोरोना विषाणूचा उद्रेक झालेला असताना केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत असून केंद्र सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिले. व्हिडिओ कॉन्ङ्गरन्सिंगद्वारे साधलेल्या या संवादात पंतप्रधानांनी लॉकडाऊनवर विशेष भर दिला आहे. यावेळी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असा आग्रह पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना केला. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्ङ्गरन्सिंगद्वारे सर्व प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अनेक उपयुक्त सूचनाही केल्या.
सर्व राज्यांमधील सरकारांनी आपल्या नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचा योग्य तो पुरवठा करावा, कुणाला त्रास होता कामा नये, असा काळजीचा सूरही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
यावेळी पंतप्रधानांनी लॉकडाऊनच्या निर्णयाला पाठिंबा देत असल्याबद्दल राज्यांचे आभार मानले. यामुळे कोविड – १९ चा प्रसार मर्यादित करण्यात भारताने काही प्रमाणात यश संपादन केले आहे. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व राज्यांनी एकत्र येऊन एक टीम म्हणून केलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली. मात्र त्याचवेळी त्यांनी जागतिक परिस्थिती अद्यापही समाधानकारक नाही. काही देशांमध्ये विषाणूच्या प्रसाराची पुन्हा लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याची माहिती दिली.
कमीतकमी जीवितहानी सुनिश्चित करणे हे देशाचे समान उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. देशातील विविध राज्यांमध्ये होणारे मजुरांचे पलायन थांबवणे गरजेचे असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. ते होऊ नये यासाठी सर्व राज्यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असेही मोदी म्हणाले. मजुरांसाठी निवार्याची सोय करण्याबरोबरच त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यात यावी, अशी सूचनाही मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना केली. मजुरांनी रस्त्यांवर येऊ नये, असे आवाहन मजुरांना करण्यात यावे, असेही मोदी म्हणाले.
लॉकडाउन संपल्यानंतर विखुरलेली लोकसंख्या पुन्हा टप्प्याटप्प्याने एकत्र आणण्यासाठी राज्य आणि केंद्राने समान निकास रणनीती आखणे महत्वाचे आहे. त्यांनी राज्यांना विचारमंथन करण्याचे आणि विकास रणनीतीसाठी सूचना पाठवण्याचे आवाहन केले.
केंद्रीय संरक्षण मंत्री, आरोग्यमंत्री, प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, गृह सचिव आणि आयसीएमआरचे महासंचालक या संवादात सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री, आरोग्यमंत्री, मुख्य सचिव, गृह सचिव आणि संबंधित राज्यांचे आरोग्य सचिव यांनीही व्हिडिओ कॉन्ङ्गरन्समध्ये भाग घेतला.