– अखिल सावंत, जीव्हीएम्स उच्च माध्यमिक, फर्मागुडी
सकाळ झाल्याची चाहूल लागली. पूर्वेकडून नुकतेच तांबडे फुटत होते. सूर्यदेव जागा होत होता. सूर्यकिरणे सोनेरी कुंचल्याचे फटकारे ओढीत फांद्यांच्या पानांमधून हळूच डोकावित होती. त्यातली काही किरणे माझ्या पायांच्या तळव्यांवर गुदगुल्या करण्यात गुंतलेली. गरमी वाढलेली असली तरी सकाळच्या गारव्यामुळे तो उबदार स्पर्श मोठा गोड वाटत होता.
इतक्यात आई हातात कसला तरी कागद घेऊन धावत आली. येताना ‘माझ्या बाळा, माझ्या शहाण्या, उठ!’ असं म्हणाली. मी जरा धडपडतच उठलो. हे बाळा, शहाण्या वगैरे शब्द आईने मागे कधी म्हटलेले तेही आता आठवत नाही. आणि अचानक हे असं कसं काय? एरवी आळसोबा, कामचुकार हे असले शब्द जास्त परिचयाचे झाले होते. त्यामुळे ‘शहाण्या’ सारखे तत्सम शब्द मला पचायला थोडा वेळ लागला. या अचानक झालेल्या गोड आघातामुळे मी स्वप्नात नसल्याची खात्री करून घेण्याकरिता चिमटे वगैरे काढले नाही तर सरळ गालावर एक चापटीच मारली. पण अर्धझोपेत असल्याने ती जरा जोरातच बसली, म्हणून मी गांधीजींचे एका गालावर मारल्यास…चे अनुकरण केले नाही. म्हणून दुसरा गाल मात्र शाबूत राहिला.
आता आई काय सांगते याकडे मी कान टवकारले. ती बोलती झाली, ‘माझ्या राजा, माझ्या बाळा… (शब्द पुन्हा जड गेले हे आणखी वेगळं सांगायला नको) उठ! अरे, हे बघ तुझा लेख छापून आलाय पेपरवर! बाहेर गरमी इतकी वाढलेली असताना आईचे हे वाक्य ऐकून मी बर्फासारखा अगदी गोठलो गेलो. तिथेच स्तब्ध कसाबसा स्वत:ला सावरत आईकडून वर्तमानपत्र घेतलं आणि चाळू लागलो. खरंच, माझ्या नावे पत्रस्वरूपी लेख छापून आला होता.
मी तो पेपर घेऊन झालेल्या अत्यानंदाने पलंगावर गडाबडा लोळू लागलो. आज हा लेख वाचून लोक माझे ‘फॅन’ होतील. मग विविध वृत्तपत्रांचे संपादक मला त्यांच्या दैनिकात स्तंभलेखनासाठी आमंत्रित करतील. कालांतराने मोठमोठे चित्रपट दिग्दर्शक, निर्माते त्यांच्या चित्रपटांसाठी पटकथा लिहिण्यासाठी मला ऑफर देतील. मी स्वत:ला मोठा लेखक झाल्याचं मला दिसू लागलं. एवढ्यात कसलातरी आवाज झाला. काहीतरी पडल्याचा तो आवाज होता आणि पाठोपाठ आईची हाक ऐकू आली. मी डोळे उघडले. पाहतो तर मी पलंगावर नसून जमिनीवर पडलो होतो आणि हातात दैनिक म्हणून समजून घेतलेले उशीचा अभ्रा होता. समोर आई उभी होती. ‘काय चालवलंय रे हे? आणि स्वप्नात काय बरळत होतास?’ प्रसंगावधान ओळखून मी उडवा-उडवीची उत्तरे दिली आणि तिला खोलीतून पिटाळलं. ‘सगळं जग जागं झालंय, उठा आता तुम्हीपण पंत! पुरे झाला हा आळशीपणा. अभ्यासाला लागा आता!’ जाता जाता आईने मोठ्या आवाजात दवंडी पेटविली.
आई खोलीतून गेल्यावर मी कपाळावर हात मारला. म्हणजे आतापर्यंत जे घडलं ते सगळं स्वप्नातीत! यात लेख वगैरे छापून येणं सगळंच खोटं होतं तर. जो लेख मी कधी लिहिलाच नव्हता तो छापून येण्याची सूतरामही शक्यता नसताना मी मात्र सुतावरून स्वर्ग गाठला होता. हे म्हणजे आम्ही स्वप्नांच्या झुल्यावर उंच उंच झुलत असतो आणि कोणीतरी आमच्या पाठीवर धक्का देऊन आम्हांला तोंडघशी पाडतो. मी एक मोठा उसासा टाकला आणि उठलो. मनाशी एक गोष्ट ठरवली, स्वप्नरंजन पुरे झालं. आता स्वप्नात नाही वास्तवात जगायचं आणि स्वप्नातील प्रत्येक गोष्ट वास्तवात साकारण्यासाठी धडपडायचं!
……….