लुईझिन फालेरोंचा खासदारकीचा राजीनामा

0
10

>> निवडणूक लढण्यास नकार देत पक्षश्रेष्ठींची ओढवून घेतली होती नाराजी

तृणमूल काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार लुईझिन फालेरो यांनी काल आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. तसेच लवकरच ते पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत. राजीनाम्यानंतर बोलताना त्यांनी सध्या तरी आपला कुठल्याही पक्षात प्रवेश करण्याचा विचार असल्याचे स्पष्ट केले.
गेल्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लुईझिन फालेरो यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षाने त्यांना फातोर्डा मतदारसंघातून उमेदवारी दिली असतानाही त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार देऊन रिंगणातून माघार घेतली होती. त्यामुळे त्यांचे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर संबंध बिघडले होते. तसेच त्या त्यांच्यावर नाराज होत्या.

तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या फालेरो यांना पक्षाने नोव्हेंबर 2021 मध्ये राज्यसभा उमेदवारी देऊन निवडून आण्ाले होते. फालेरो यांच्या खासदारकीचा 3 वर्षे 7 महिने एवढा कार्यकाळ शिल्लक राहिला होता. मात्र, फालेरो यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, यासाठी पक्षश्रेष्ठींचा त्यांच्यावर दबाव होता.

फालेरो यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आता नव्याने निवडणूक घ्यावी लागणार असून, या जागी आता तृणमूल काँग्रेस कुणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतरच पक्ष आपला उमेदवार जाहीर करणार असल्याचे तृणमूलने स्पष्ट केले आहे.

आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत
कित्येक पक्ष आपल्या संपर्कात असून, या पक्षांनी आपणाला वेगवेगळ्या ऑफर्स दिलेल्या आहेत; मात्र सध्या तरी आपण कुठल्याही पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला नाही, असे लुईझिन फालेरो यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर त्यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवू शकतो, असेही संकेत दिले.