लाडली लक्ष्मी योजनेच्या प्रलंबित तीन हजार अर्जांना लवकरच मंजुरी

0
117

महिला व बालकल्याण खात्याच्या लाडली लक्ष्मी योजनेअर्तंगत प्रलंबित १० हजार अर्जांपैकी ३ हजार अर्ज नोव्हेंबर महिन्यात निकालात काढण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ५१ हजार ८५२ जणांना लाडी लक्ष्मी योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. तसेच पंधरा युवतींना निधीचा शिक्षणासाठी वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बाल कल्याण खात्याचे संचालक दीपक देसाई यांनी काल दिली.

लाडली लक्ष्मी योजनेअर्ंतगत निधी केवळ लग्नासाठी वापरण्यास सुरुवातीला मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर हा निधी शिक्षण व व्यवसाय करण्यासाठी वापरण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च शिक्षणासाठी निधी वापरण्यासाठी आत्तापर्यंत पंधरा जणांना मान्यता देण्यात आली असून आणखी पंधरा जणांचे अर्ज प्रलंबित आहेत. खात्याच्या अर्ज मंजुरी समितीच्या बैठकीत या अर्जांना मंजुरी दिली जाणार आहे, असेही देसाई यांनी सांगितले.

गृहआधार : २४ हजार अर्ज प्रतीक्षेत
गृहआधार योजनेसाठी २४ हजार अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारने निश्‍चित केलेल्या मर्यादेनुसार आत्तापर्यंत १ लाख ५२ हजार महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. गृह आधार योजनेच्या लाभार्थींचा आढावा घेण्याची सूचना संबंधित कर्मचार्‍यांना करण्यात आली आहे. तीन लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या काही महिलांनी आपले मानधन बंद करण्यासाठी अर्ज सादर करण्यास सुरुवात केली आहे, असेही देसाई यांनी सांगितले.

महिला व बालकल्याण खात्याच्या कारभारात सुसूत्रता आणि शिस्त आणण्याच्या उद्देशाने कडक पाऊले उचलण्यात आली आहेत. यात आत्तापर्यंत चार कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. तर ३३ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कर्मचार्‍यांचा बेशिस्त कारभार खपवून घेतला जाणार नाही, असेही देसाई यांनी सांगितले.

अपना घरातील कारभार सुधारण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आपण तीन आठवड्यांत चार वेळा अपना घराला भेट देऊन कर्मचारी वर्ग तसेच अपना घरातील मुलांशी संवाद साधला आहे. मुलांशी मैत्रीचे संबंध प्रस्तापित करण्याची सूचना करण्यात आली आहे. अपना घरात नवीन टी. व्ही. संच उपलब्ध करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अपना घरासाठी तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. मुलांना इनडोअर खेळाबरोबर आऊटडोेअर खेळांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. तसेच मुलांना योग्य आहार पुरविण्याची सूचना संबंधितांना करण्यात आली आहे, असेही संचालक देसाई यांनी सांगितले.

लाभार्थींच्या सर्वेक्षणाबाबत
मुख्यमंत्री निर्णय घेणार

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गृह आधार योजनेच्या लाभार्थींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी घोषणा केली होती. परंतु, गृह आधार योजनेच्या लाभार्थींच्या सर्वेक्षणाबाबत अद्यापर्यंत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. गृह आधार योजनेच्या लाभार्थींच्या सर्वेक्षणासंबंधीची फाईल मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहे. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्र्याकडून घेतला जाणार आहे, अशी माहिती देसाई यांनी दिली.