- गौरी भालचंद्र
‘‘अरे क्षमा कशाला मागतोस? पश्चाताप झाला, चूक कळून आली.. त्यातच क्षमा आहे. अंधारात माणूस रस्ता चुकतो.. तसाच फिरत राहतो पण पहाटेच्या अंधुक प्रकाशात त्याची चुकलेल्या वाटेवरची पावलं परतून सरळ मार्गाला लागतात’’.
आपल्या जीवनात निरनिराळ्या प्रकारच्या व्यक्ति येतात.. प्रत्येकाचे स्वभाव भिन्न भिन्न असतात. प्रत्येकाच्या स्वभावातून काही ना काही बोध आपण घेतच असतो व त्यातूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडतो. काही व्यक्तींचे स्वभाव आपल्याला तितकेसे बरे वाटत नाहीत तर काही व्यक्ति फारच मन वेधून घेतात.
पण ज्या व्यक्तींबद्दल आपण वाईट मत बनवतो त्या खरोखरच आपले हितचिंतक असतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण त्यांच्या वाईट वागण्यामागेही एक रहस्य असते… त्यांचे पूर्वीचे अनुभव ध्यानात घेऊन ते पुढे तसे वागत असतात.. आपण त्यांना समजून घ्यायचं असतं. त्यामुळे ते विचार बदलून चांगले विचार करायला लागतात.. आणि प्रत्येकाची मने स्वच्छ होतात.. जणू काही निरभ्र आकाशच..!
आपल्या जीवनात येणारी मायेची माणसेच पैशापेक्षाही लाख मोलाची असतात. त्यांची गणना पैशात करताच येणार नाही. डिचोलीत असताना आमच्या शेजारी एक काकाआजोबा राहायचे. तुम्हाला वाटेल हे काकाआजोबा काय प्रकरण आहे बुवा..? पण सांगायची गम्मत म्हणजे आमच्या आजूबाजूचे सर्व लोक त्यांना काका म्हणायचे पण वयाने ते मला आजोबाच असल्याने मी आपली त्यांना काकाआजोबा म्हणायचे.
हा.. ! तर मी काय म्हणत होते, त्यांचा स्वभाव म्हणजे एक कोडंच होतं. शिगेला पोचणारी सहनशीलता अंगी लेऊन ते अगदी शांतपणे फिरायचे. काकाआजोबा कधी कधी माझ्याकडे मनातलं बोलायचे तेवढंच त्यांना समाधान.
रुंद चेहरा, तरतरीत नाक.. त्यांच्या डोळ्याला असलेला तो चष्मा तर त्यांच्या भारदस्तपणात अधिकच भर घालायचा. चेहर्यावर नेहमी विलसणारं ते स्मितहास्य अनेकांच्या दुःखी चेहर्यांना टवटवी द्यायचं. क्षणभर आपलं दुःख विसरून लोक त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायचे..
त्यांचा भाऊ मोठा असल्याने दरवर्षी गणेशाचे आगमन त्यांच्या घरी व्हायचे पण काकाआजोबांच्या लहान मुलांना आपापसातल्या मतभेदावरून त्यांनी नमस्कारही करु दिला नाही म्हणे गणपतीला… केवढ्या उत्साहानं गणेश चतुर्थी साजरी करतात लोकं .. पण काकाआजोबांच्या मुलांना ते लहानपण कधीच उपभोगायला मिळालं नाही.. वरून त्यांच्याच अंगणातील फुलं तोडून काकाआजोबांचे मोठे भाऊ गणपतीला वाहात..
काकाआजोबा म्हणायचे मला, ‘‘त्यावेळी तुझ्या आजीनं सांगितलं, बाळांनो आपण देवाला केलेला नमस्कार कुठूनही केला तरी पोचतो. तुम्ही इथूनच नमस्कार करा.. देवाला सर्व समजतं…’’, असं बोलताना त्यांचे डोळे पाण्यानं भरायचे. मग मी त्यांना म्हणायचे, ‘‘पण काकाआजोबा तुम्ही गप्प का राहिलात एवढं सोसून..?’’
त्यावर ते म्हणायचे, ‘‘बेटा माणसानं कधीच आपला हक्क मागू नये, देव तो आपणहून देतो. देवालाही कळते मनातील श्रद्धा.. भक्ती.. आणि शेवटी त्याच्या त्याच्या चुकीचं प्रायश्चित्त देव प्रत्येकाला देतो. मग आपण का उगाच बोलायचं..?
आजीही म्हणायची, ‘‘अगो.. माझा पुतण्या कायम आपल्या बापाप्रमाणे वागायचा. ह्यांच्याशी तुसडेपणाने वागायचा कधी गेले तर.. ! तोच वडील गेल्यावर आलेला ह्यांच्याकडे क्षमा मागायला.. ह्यांच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला, ‘‘काका, मला क्षमा करा. मी चुकलो. आपली माणसं तोडायची नसतात. वडील माणसांच्या आधाराची फार गरज असते.. माणूस अनुभवाने शहाणा होतो. पैसे देऊन हवं ते मिळतं पण आपली माणसं मिळत नाहीत.. मला जवळ करा. तुमच्या घरातील संस्कृतीनं माझं बुरसटलेलं मन शुद्ध होईल’’.
मग काकाआजोबा काय म्हणाले.. ? असे विचारताच आजी म्हणाली, ‘‘अगो ते काय म्हणणार? त्यांचा स्वभाव तर तुला माहीत आहेच.. त्यांचं मन अधिकच मऊ झाल’’ं.
त्यांनी त्याला जवळ घेऊन म्हटलं, ‘‘अरे क्षमा कशाला मागतोस.. पश्चाताप झाला, चूक कळून आली.. त्यातच क्षमा आहे. अंधारात माणूस रस्ता चुकतो.. तसाच फिरत राहतो पण पहाटेच्या अंधुक प्रकाशात त्याची चुकलेल्या वाटेवरची पावलं परतून सरळ मार्गाला लागतात’’.
त्यांच्या साध्या राहणीने आणि उच्च विचारसरणीने लोक त्यांना आजही मानतात. आज कितीही मोठे झालेले, शिकून अमेरिकेत गेलेले त्यांचे विद्यार्थी अभिमानाने सांगतात.. ‘‘आमचे सर म्हणजे अगदी देवमाणूस!’’ माणसाच्या व्यक्तिमत्त्वातून, त्याच्या वागण्या- बोलण्यातून त्याची खरी ओळख होत असते.. व्यक्तिमत्त्वाची उभारणी होत असते…