भारतीय बनावटीची कोरोना विरोधी लस ‘कोव्हॅक्सिन’ला लहान मुलांवरील वापरासाठी आपत्कालीन मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. भारत बायोटेक कंपनीने २ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणीचा संपूर्ण अहवाल ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (डीजीसीआय) पाठवला आहे. भारत बायोटेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एल्ला यांनी माहिती दिली.
डीसीजीआयकडून लवकरच भारत बायोटेकच्या अहवालाची तपासणी केली जाणार आहे. या चाचणीचा अहवाल समाधानकारक वाटला, तर लवकरच कोव्हॅक्सिनला लहान मुलांवरील वापरला आपत्कालीन मंजुरी मिळू शकते. तसे झाल्यास देशात लहान मुलांना दिली जाणारी पहिली स्वदेशी लस भारताला उपलब्ध होणार आहे.
एम्ससह देशातील विविध ठिकाणी कोव्हॅक्सिन लसीची लहान मुलांवर चाचणी घेण्यात आली होती. एकूण तीन टप्प्यात चाचणी घेतली गेली. पहिल्या टप्प्यात १२ ते १८ वर्षांमधील मुलांवर चाचणी केली गेली. त्यानंतर ६ ते १२ वयोगट आणि सर्वात शेवटी २ ते ६ वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी केली गेली. देशात १८ वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लस घेता येत आहे; पण लहान मुलांसाठी अद्याप परवागनी देण्यात आलेली नाही.
दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रौढांवरील वापरासाठी कोव्हॅक्सिनला अद्याप मान्यता मिळालेली नाही. ही मान्यता याच महिन्यात मंजुरी दिली जाईल, असा विश्वास डॉ. एल्ला यांनी व्यक्त केला. डब्ल्यूएचओला भारत बायोटेककडून आवश्यक अशी सर्व माहिती पुरविण्यात आल्याचे एल्ला यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, भारत बायोटेकने डब्ल्यूएचओला ९ जुलै रोजी सर्व माहिती सुपूर्द केली आहे. जागतिक संघटनेला एखाद्या लसीचे परीक्षण करण्यासाठी सहा आठवड्यांचा कालावधी लागतो. डब्ल्यूएचओकडून कोव्हॅक्सिनला मंजुरी मिळाली, तर ही लस घेतलेल्या नागरिकांना क्वांराटइन नियमांचे पालन न करता परदेश यात्रा करणे शक्य होणार आहे.