लसीकरण पूर्ण झालेल्यांनाही डेल्टाचा धोका ः आयसीएमआर

0
45

कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींसाठीही कोरोनाचा डेल्टा हा प्रकार धोकादायक ठरत असल्याचे आयसीएमआरने केलेल्या अभ्यासाद्वारे समोर आले आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींना ‘डेल्टा’ची बाधा झाली तर त्यांच्या शरीरातील अँटीबॉडीजचा परिणाम दुप्पट किंवा तिप्पट पटीने घसरत असल्याचेही समोर आले आहे. ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’कडून (आयसीएमआर) चेन्नईमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात ही गोष्ट समोर आली आहे.

आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा डेल्टा हा प्रकार लसीकरण पूर्ण झालेल्या आणि लस न घेतलेल्या अशा दोन्ही तर्‍हेच्या नागरिकांसाठी धोकादायक आहे. मात्र त्यातही लसीकरण झालेल्यांना धोका फार कमी असतो.

डेल्टा व त्याचे प्रकार जगभरात अत्यंत वेगाने फैलावत असून भारतातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसाठी हा प्रकार जास्त कारणीभूत ठरला. आयसीएमआरने केलेल्या अभ्यासात डेल्टाच्या संक्रमणानंतर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस घेणार्‍या व्यक्तींच्या शरीरातील अँटीबॉडीजची परिणामकारकता घटली असल्याचे म्हटले आहे.

नाकावाटे देण्यात येणारी
कोरोना लस लवकरच

भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आतापर्यंत भारतात ५० कोटी लसीकरण झाले आहे. अशातच आता नाकावाटे दिली जाणारी बीबीव्ही १५४ ही भारताची पहिली लस तयार होत आहे. या लशीच्या दुसर्‍या टप्प्यातील चाचण्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
नाकावाटे देण्यात येणारी ही भारताची पहिली लस आहे. भारत बायोटेक आणि सेंट लुसियाचे वॉशिंग्टन विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ही लस तयार केली जात आहे. जानेवारी महिन्यात या लशीच्या पहिल्या चाचणीला सुरूवात झाली. त्यानंतर आता लशीच्या दुसर्‍या चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. ह्या लशीमध्ये इंजेक्शनची गरज नसून केवळ दोन थेंब नाकात टाकण्यात येणार आहेत.