>> मन की बात मध्ये पंतप्रधानांचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बातमध्ये जनतेशी संवाद साधताना, येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनावरील लस देण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे. लशीच्या बाबतीत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेने देश हादरला आहे. अशा या संकटांचा सामना करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
पंतप्रधान मोदींनी अनेक आरोग्य तज्ज्ञांशी चर्चा केली. यात लॅबमधील तंत्रज्ञ आणि फ्रंटलाइन वर्कर्शशीही पंतप्रधान मोदी बोलले आणि त्यांचा अनुभव जाणून घेतला. कोरोनावर मात करण्यासाठी आपल्याला आरोग्य तज्ज्ञ आणि त्यांनी दिलेल्या सूचनांना प्राधान्य दिले पाहिजे, असे मोदी म्हणाले.
कोरोनाविरोधी लढाई जिंकण्यासाठी लस महत्त्वाची आहे. लसीकरण महत्त्वाचे आहे. पण लशीबाबत नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. केंद्र सरकारकडून राज्यांना लशींचा मोफत पुरवठा केला जात आहे. कोरोनाच्या या संकटात केंद्र सरकार राज्यांना मदत करण्यासाठी आपल्या सर्व शक्तींचा उपयोग करत असल्याचे मोदी म्हणाले.
देशात कोरोनावरील लसीकरण मोहीम सुरू आहे. यात खासगी क्षेत्रानेही सहभाही व्हावे. खासगी क्षेत्रातील उद्योगांनी आणि कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांचे लसीकरण करावे. तसेच मोफत लसीकरणाच्या फायद्यांबाबत राज्यांनी जनजागृती करून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवावी, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.