लसीकरणात भारताने अमेरिकेलाही टाकले मागे

0
47

>> आतापर्यंत दिले ३२ कोटी ३६ लाख डोस

गेल्या आठवड्यापासून म्हणजेच २१ जूनपासून देशात १८ ते ४४ या वयोगटासाठी केंद्र सरकारकडून मोफत लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढला असून, सोमवारच्या ताज्या आकडेवारीनुसार भारताने डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७ लसीचे डोस देण्यात आले आहेत. हा जगातील सर्वाधिक लसीकरणाचा आकडा असून, ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे वर्णन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केले आहे.

आरोग्य मंत्रालयाने सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जगातील ६ देशांतील लसीकरणाची आकडेवारी दिली. त्यात भारतात सर्वाधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. अमेरिकेत ३२ कोटी ३३ लाख २७ हजार ३२८ डोस देण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ ब्रिटन (७ कोटी ६७ लाख ७४ हजार ९९०), जर्मनी (७ कोटी १४ लाख ३७ हजार ५१४), फ्रान्स (५ कोटी २४ लाख ५७ हजार २८८) आणि इटली (४ कोटी ९६ लाख ५० हजार ७२१) या देशांचा क्रमांक लागतो.