लष्करी भरतीच्या परीक्षेत पेपरफुटी

0
111

>> परीक्षा रद्द, गोव्यासह देशभरातून शेकडोंना अटक

सैन्यातील नागरी पदांच्या भरतीसाठी देशभरात होणारी लेखी परीक्षा पेपर आधीच फुटल्यामुळे रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणी ठाणे व पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने महाराष्ट्र व गोव्यासह देशभरात विविध ठिकाणी छापे टाकून शेकडो संशयितांना अटक केली आहे.

देशातील विविध केंद्रांवर काल रविवारी नऊ वाजता सैन्यातील भरतीसाठी लेखी परीक्षा होणार होती. त्यानुसार अनेक केंद्रांवर परीक्षा सुरूही झाली. मात्र, ही प्रश्नपत्रिका शनिवारी रात्रीच काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी ठाणे, नाशिक, पुणे, नागपूरसह गोव्यात अनेक ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत १८ आरोपींसह ३५० हून अधिक उमेदवारांना अटक केली. या प्रकरणी अजूनही छापासत्र सुरू आहे.
देशभरातील छाप्यात ३६८ अटकेत
ठाणे पोलिसांनी या प्रकरणी देशभरातील विविध ठिकाणी कारवाई करत छापे टाकले आहेत. नागपूर, पुणे, नाशिक आणि गोवा येथे केलेल्या कारवाईत आतापर्यंत १८ आरोपींना तर ३५० विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.
ठाणे पोलिसांना पहिली खबर
पुण्यातील हडपसर येथील भेकराईनगर येथील एका केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र शनिवारपासूनच या परीक्षेची प्रश्‍नपत्रिकेची विक्री करण्यात येत होती. त्यासाठी आरोपींनी शनिवारी रात्री ७० ते ८० उमेदवारांना भेकराईनगर येथे बोलावले. प्रश्‍नपत्रिका पुरविण्यासाठी त्यांनी प्रत्येकाकडून तीन लाख रुपये घेतले आणि व्हॉटसअपद्वारे प्रश्‍नपत्रिका पाठविली. ठाणे पोलिसांना याबाबत सर्वप्रथम माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना याबाबतची माहिती दिली. यावेळी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आठ जणांपैकी दोघांची नावे संतोष शिंदे आणि धनाजी जाधव अशी आहेत. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
एका प्रश्‍नपत्रिकेमागे ४ ते ५ लाख
प्रश्नपत्रिका फोडणार्‍यांनी उमेदवारांकडून एका प्रश्नपत्रिकेमागे ४ ते ५ लाख रुपये घेण्यात येत होते अशी माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. अनेक उमेदवारांना ही प्रश्नपत्रिका मिळाली. फुटलेली प्रश्नपत्रिका सैन्य भरती बोर्डाने पडताळणीसाठी पाठवली होती. या सार्‍या प्रकरणामुळे प्रामाणिकपणे तयारी करून परीक्षा देणार्‍या उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेर सैन्य भरती बोर्डाने ही परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळं उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

गोव्यात तिघांना अटक
सैनभरती लेखी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी गोव्यातही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी धडक कारवाई करत हणजुणे येथून या प्रकरणात गुंतलेल्या तीन प्रमुख संशयितांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणात सहभागी असलेल्या ४९ विद्यार्थ्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांनी व्हॉट्‌सअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. या पेपर प्रकरणाची माहिती विद्यार्थ्यांना दिली होती. या प्रकरणी पोलिसांची रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.
त्याचप्रमाणे पुण्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत पुणे परिसरातून आठ जणांना ताब्यात घेतले आहे.