लढाई अंतिम टप्प्यात

0
16

गोव्यातील दोन्ही मतदारसंघांतील लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अगदी अंतिम टप्प्यात आला आहे. दक्षिण गोव्याच्या भाजप उमेदवार पल्लवी धेंपो यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा नुकतीच सांकवाळला झाली आणि आज उत्तर गोव्याचे भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांच्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हापशात येत आहेत. गोव्यामध्ये लोकसभेच्या केवळ दोन जागा जरी असल्या, तरी भारतीय जनता पक्ष प्रत्येक जागेकडे किती गांभीर्याने पाहतो हे ह्यावरून पुन्हा एकवार दिसून आले आहे. ‘अबकी बार, चारसौ पार’ ची भाजपची भाषा आता केवळ ‘फिर एक बार, मोदी सरकार’ पर्यंत नरमाईत बदलली असली, तरी प्रत्येक जागेसाठी पक्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतो आहे. याउलट काँग्रेस पक्षाचे कोणतेही स्टार प्रचारक अद्याप तरी गोव्याकडे फिरकलेले नाहीत. पक्षाच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधींची एखादी सभा गोव्यात ठेवली गेली असती, तरी त्यातून पक्षास पूरक वातावरणनिर्मिती होऊ शकली असती, परंतु गोवा हा काँग्रेस श्रेष्ठींच्या खिजगणतीतही नसावा. ‘इंडिया’ आघाडीतर्फे काँग्रेस ही निवडणूक लढवतो आहे, परंतु ह्या आघाडीतील घटकपक्षांच्या नेत्यांना देखील गोव्याकडे लक्ष द्यावेसे वाटलेले नाही. केंद्रीय नेत्यांचे सोडाच, परंतु स्थानिक घटकपक्षांचे बडे नेतेही काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात विशेष सक्रिय दिसत नाहीत. भारतीय जनता पक्षाने एकीकडे शिस्तबद्ध प्रचार राबवला आहेच, शिवाय दुसरीकडे आपल्या पक्षापासून दूर गेलेल्या नेत्यांचा पाठिंबा मिळवण्याची मोठी मोहीमही त्यांनी राबवलेली दिसते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे ह्या दोघांनीही व्यक्तिशः तसे प्रयत्न चालवलेले आहेत. कोणत्याही बाजूने दगा होऊ नये आणि त्याचा फटका मताधिक्याला बसू नये यासाठी ही खबरदारी आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर, माजी मंत्री मिलिंद नाईक, दक्षिण गोव्याच्या तिकिटाचे इच्छुक बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर, माजी मंत्री दीपक पाऊसकर, अशा प्रत्येकापर्यंत जाऊन त्यांचा पाठिंबा मिळवण्याचे जोराचे प्रयत्न भाजपने चालवले आहेत. विद्यमान मंत्री विश्वजित राणे यांनी आपले वडील प्रतापसिंह राणे यांचे आणि श्रीपाद नाईक यांचे विशेष नाते असून ह्या निवडणुकीत त्यांना त्यांचा पाठिंबा असल्याचे जाहीर करून टाकले आहे. प्रतापसिंह राणे यांच्या पाठिंब्याची घोषणा श्रीपाद नाईक यांना सत्तरीत लाभदायक ठरेल. श्रीपाद यांना मोठी आघाडी मिळवून देऊन विश्वजित आपण कसे लोकनेते आहोत हे पक्षश्रेष्ठींच्या मनात ठसवण्याची संधी निश्चित साधतील. दक्षिण गोव्यात सुदिन ढवळीकर यांनी पल्लवी धेंपो यांना सर्वांत मोठी आघाडी मगोतर्फे मडकईतून मिळवून देण्याचा चंग बांधला आहे. भारतीय जनता पक्ष प्रचाराच्या बाबतीत तरी सध्या आघाडीवर दिसतो. काँग्रेस नेते रमाकांत खलप यांची सारी प्रतिष्ठा उत्तर गोव्यात पणाला लागली आहे, परंतु सर्व स्तरांवर पोहोचण्यात ते कमी पडत आहेत. म्हापसा अर्बन बँक घोटाळ्याच्या प्रकरणाला आक्रमकपणे ऐरणीवर आणून मुख्यमंत्र्यांनी खलपांची कोंडी केली आहे. दक्षिण गोव्यात विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय घटनेसंदर्भात आक्षेपार्ह विधान करून स्वयंगोल करून घेतला. प्रचारातही त्यांचा जोर दिसत नाही. विशेषतः ज्या सालसेतपलीकडे त्यांनी पोहोचणे आवश्यक होते, तेथवर ते सक्रियपणे पोहोचलेले दिसत नाहीत. हे दोन्ही उमेदवार भाजपशी तुल्यबळ लढत देण्यात यशस्वी ठरतात का ह्याकडे मतदारांचे लक्ष आहे. श्रीपाद यांना एक लाखाहून अधिक मतांची आघाडी मिळवून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती आणि दक्षिण गोव्याचा उमेदवार साठ हजारांच्या आघाडीने निवडून येईल असे उमेदवाराच्या नावाची घोषणा व्हायच्याही आधी मुख्यमंत्री म्हणाले होते. सद्यस्थिती पाहता दक्षिण गोव्यात त्याहून मोठी आघाडी मिळवण्याची संधी भाजपला आहे असे दिसते. रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने दोन्ही मतदारसंघांत आपले उमेदवार उभे केले आहेत आणि त्या पक्षाची गोवाभिमुख नीती लक्षात घेता, परंपरावादी मतदार त्यांच्या पारड्यात किती मतदान करतात आणि त्यामुळे काँग्रेसचे मताधिक्य किती कमी होते हे पाहावे लागेल. आरजी आणि ‘नोटा’ किती मते उचलणार, त्याचा उर्वरित उमेदवारांना किती फटका बसणार हे पहावे लागेल. भाजपचा सारा प्रचार ‘मोदींची गॅरंटी’ ह्या विषयाभोवती आणि गेल्या दहा वर्षांतील कामगिरीभोवती केंद्रित आहे आणि त्यामुळे कोळसा वाहतूक, रेलमार्ग दुपदरीकरण, म्हादई असे काँग्रेस पुढे आणू इच्छित असलेले गोव्यासंदर्भातील सर्व स्थानिक मुद्दे पिछाडीवर ढकलले गेले आहेत. त्यामुळे त्याचा ह्या निवडणुकीच्या निकालावर होणारा परिणामही अभ्यासण्याजोगा असेल.