‘लक्षवेधी सूचने’वरून विरोधकांचा गोंधळ

0
8

>> दोन्ही लक्षवेधी सूचना सत्ताधारी आमदारांच्याच चर्चेला आल्याने आक्षेप; दोनपैकी एक लक्षवेधी सूचना विरोधकांची असावी

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांना सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करीत काल विरोधी पक्षांच्या आमदारांनी सभापती रमेश तवडकर यांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेत गोंधळ घातला. त्यामुळे सभापतींना सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत स्थगित करावे लागले. विधानसभेच्या कालच्या कामकाजावेळी दोन्ही लक्षवेधी सूचना सत्ताधारी आमदारांच्याच चर्चेला येणार असल्याने त्याला विरोधकांनी हरकत नोंदवत गोंधळ घातला. विधानसभेत चर्चेला येणाऱ्या दोनपैकी एक लक्षवेधी सूचना ही विरोधी आमदारांची असावी, अशी मागणी विरोधकांची होती.

विधानसभेच्या कालच्या कामकाज सूचीवर संकल्प आमोणकर आणि रुडॉल्फ फर्नांडिस या दोन्ही भाजप आमदारांच्याच लक्षवेधी सूचनांवर चर्चा होणार असल्याचे नमूद केले होते. काल विधानसभेत शून्य प्रहरानंतर सभापतींनी लक्षवेधी सूचना पुकारली. त्यानंतर संकल्प आमोणकर यांनी मांडलेली एक लक्षवेधी सूचना चर्चेसाठी आली असता, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी कामकाजात घेतलेल्या दोन्ही लक्षवेधी सूचना ह्या भाजप आमदारांच्या असल्याचे सांगून त्याला जोरदार आक्षेप घेतला. एक लक्षवेधी सूचना ही सत्ताधारी आमदाराची, तर दुसरी विरोधी पक्षाच्या आमदाराची असायला हवी होती, असे आलेमाव म्हणाले. सत्ताधारी आमदारांच्याच दोन्ही लक्षवेधी सूचना कामकाजात चर्चेसाठी सभापतींनी घेणे हा पक्षपात असल्याचा आरोप आलेमाव यांनी केला आणि त्याविषयी सभापतींनी खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. मात्र, सभापतींनी मागणीकडे दुर्लक्ष केल्यानंतर युरी आलेमाव, कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा या काँग्रेस आमदारांसह क्रूझ सिल्वा, व्हेन्झी व्हिएगस (आप) व विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड) यांनी त्यांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत जाऊन गोंधळ घातला. विरोधी आमदारांना यावेळी सभापती रमेश तवडकर आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शांत करण्याचा, तसेच समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आल्यानंतर सभापतींनी सभागृहाचे कामकाज दुपारी 1 वाजेपर्यंत स्थगित केले.