लक्षयची रौप्य कमाइ

0
93

युवा नेमबाज लक्षय शेवरान याने सनसनाटी कामगिरी करत पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात भारताला रौप्य पदक मिळवून दिले. जेएससी शूटिंग रेंजवर त्याने शेवटच्या फेरीत ४३ गुणांचा वेध घेत आपले दुसरे स्थान निश्‍चित केले. केवळ २६ गुणांचा वेध घेऊ शकलेल्या मानवजीत सिंग संधूला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. लक्षयला पन्नासपैकी केवळ सात प्रयत्नांत लक्ष्य साधता आले नाही. लक्षयचा पहिलाच प्रयत्न अपयशी ठरला होता.

यानंतर त्याने सलग सतरा वेळा अचूक नेम साधला. परंतु, १९वा, २१वा व २२वा प्रयत्न हुकल्याने सुवर्णपदकाच्या शर्यतीतून त्याला बाहेर व्हावे लागले. तैवानच्या यांग कुनपी याने ४८ गुण मिळवून सुवर्णपदकावर नाव कोरले. कोरियाचा देमयोंग आहन ३० गुणांसह तिसर्‍या स्थानी राहिला. ४० नेमांनंतर सर्वांत कमी गुण झाल्याने त्याला बाहेर व्हावे लागले. लक्षयने अंतिम १० नेमांपूर्वी ३४ व कुनपी याने ३८ गुण घेतले होते. कुनपीने शेवटच्या दहा पैकी दहा वेळा लक्ष्य साधने तर लक्षय याचा ४९वा प्रयत्न निष्फळ ठरला. पात्रता फेरीच्या पहिल्या दिवशी ७२ गुणांसह व दुसर्‍या दिवशी ११९ गुण घेत पहिल्या स्थानावर राहूनही संधूला रिकाम्या हाताने परतावे लागले.