
ब्रिटनची राजधानी लंडन शहराच्या दक्षिण पश्चिम भागातील एका भूयारी रेल स्थानकावर काल सकाळी झालेल्या स्फोटात २२ जण जखमी झाले. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी या घटनेला दहशतवादी घटना असे संबोधले आहे.
सदर स्थानकावरील एका बादलीतील स्फोटकाचा स्फोट होऊन त्यातील आगीमुळे बहुतेकांच्या चेहर्यांना इजा झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या संदर्भात मेट्रोपोलिटन पोलिसांच्या एका निवेदनात म्हटले आहे की या क्षणी स्फोटाचे निश्चित कारण सांगणे शक्य नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार काल सकाळी वर्दळीच्या वेळी पार्सन्स ग्रीन स्टेशनवर डिस्ट्रिक्ट लाईन ट्युब ट्रेन पोचली असताना हा स्फोट झाला. या स्फोटानंतर दाखल झालेल्या रुग्णवाहिकांमधून १८ जखमींना इस्पितळात नेण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त मार्क रौले यांनी सांगितले. मात्र कोणाला अटक करण्यात आली आहे काय यावर त्यांनी उत्तर दिले नाही.
स्फोटामुळे जखमी होण्याबरोबरच यावेळी झालेल्या धावपळीतही अनेकजण खाली पडून तुडवले गेल्यानेही जखमी झाल्याचे सांगण्यात आले.