पाहुण्या श्रीलंकेने पाकिस्तानला त्याच्याच भूमीवर लोळविण्याचा पराक्रम केला. काल संपलेल्या टी-ट्वेंटी मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना १३ धावांनी जिंकून श्रीलंकेने पाकिस्तानसा ‘व्हाईटवॉश’ दिला. श्रीलंकेच्या दुसर्या फळीतील संघाकडून झालेल्या या मानहानीकारक पराभवामुळे टी-ट्वेंटीमध्ये प्रथम क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानच्या संघावर आजी-माजी खेळाडूंनी टीकेची झोड उठवली आहे. काल तिसर्या टी-ट्वेंटी सामन्यात श्रीलंकेचा डाव ७ बाद १४७ धावांत रोखल्यानंतरही पाकिस्तानला केवळ ६ बाद १३४ धावांपर्यंतच मजल मारणे शक्य झाले. या विजयासह श्रीलंकेेने मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले.
नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडल्यानंतर श्रीलंकेच्या बहुतांशी फलंदाजांना खेळपट्टीशी जुळवून घेता आले नाही. पाकिस्तानी गोलंदाजांनी ठराविक अंतराने लंकेला धक्के दिले. पदार्पणवीर ओशादा फर्नांडो याने संधीचे सोने करताना ४८ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७८ धावांची झंझावाती खेळी केली. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने सर्वाधिक ३ गडी बाद केले. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना कासुन रजिताने पहिल्याच चेंडूवर फखर झमानचा त्रिफळा उडवून लंकेला पहिले यश मिळवून दिले. बाबर आझम (२७) व हारिस सोहेल (५२) यांनी दुसर्या गड्यासाठी ७६ धावांची भागीदारी केली. ही जोडी खेळपट्टीवर असेपर्यंत पाकिस्तानचा संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत होता. लाहिरु कुमारा व वानिंदू हसारंगा या जोडगोळीने पाकला ब्रेक लगावत त्यांची १ बाद ७६ वरून ६ बाद १११ अशी स्थिती केली. गडी बाद होत राहिल्याने संघाची धावगती मंदावली व आवश्यक धावगती वाढत गेली. लंकेच्या गोलंदाजांनी दबावाखाली अचूक टप्पा राखताना संघाचा विजय साकार केला.