बार्देश तालुक्यात झालेल्या एका जमीन घोटाळ्यातील एक प्रमुख संशयित आरोपी रोहन हरमलकर याला काल सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली.
सक्तवसुली संचालनालयाने गेल्या एप्रिल महिन्यात मारलेल्या छाप्यात तब्बल 1 हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याची कागदपत्रे रोहन हरमलकरकडे सापडली होती. यावेळी बोगस जमीन कागदपत्रे, तसेच जमिनीच्या मालकी कागदपत्रांत फेरफार करून बेकायदेशीररित्या जमीन हस्तांतरण करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यात आसगाव, हडफडे व हणजूण येथील लाखो चौरस मीटर एवढ्या जमिनीचा घोटाळा केल्याचे समोर आले होते.
याशिवाय या छाप्यात रोहन हरमलकरच्या घरात सुमारे 600 कोटी रुपये एवढ्या किमतीच्या जमिनीची मालकी हक्काची कागदपत्रे सापडल्यानंतर खळबळ माजली होती.
रोहन हरमलकर हा एक राजकीय नेता असून, 2022 सालच्या विधानसभा निवडणुकी वेळी त्याने भाजपची उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला होता; पण भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्याने कुंभारजुवे मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्याचा पराभव झाला होता.