गोवा भरती रोजगार सोसायटीच्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या दि. २५ रोजी गोवा विधानसभेवर शांततापूर्ण पध्दतीने हजारोंच्या संख्येने महामोर्चा नेणार असल्याची माहिती गोवा कामगार महासंघाचे नेते अजितसिंह राणे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या मोर्चात कामगारांबरोबरच समविचारी नागरिकही सहभागी होतील. सह्यांचे निवेदनही सरकारला सादर केले जाईल. गेले ७० दिवस हा लढा शांततापूर्ण मार्गाने चालू आहे.या मोर्चाचा कायदा आणि सुव्यवस्थेवर कोणताही परिणाम होऊ दिला जाणार नाही, असे असतानाही सरकारने मोर्चा अडविल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशारा राणे व स्वाती केरकर यांनी दिला आहे. दि. २५ पर्यंत मागणी पूर्ण न केल्यास आझाद मैदानावर कामगार आमरण उपोषण करणार आहेत. मनुष्यबळ विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मधुकर फळ यांनी पत्रकारांकडे जे वर्तन केले त्याचाही त्यांनी निषेध केला. आजपासून कामगारांनी साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही राणे यांनी दिली.