>> आजपासून २ दिवस चालणार मेळावा; ४ टप्प्यांत होणार भरती प्रक्रिया; १५५ कंपन्यांद्वारे ५ हजार रोजगार संधी उपलब्ध
राज्य सरकारच्या मंगळवार दि. ८ नोव्हेंबरपासून दोन दिवस चालणार्या महानोकरभरती मेळाव्यासाठी जवळपास १५ हजार बेरोजगारांनी नावनोंदणी केली असून, मंगळवार दि. ८ व बुधवार दि. ९ रोजी ४ टप्प्यांत ही नोकरभरती प्रक्रिया होणार आहे. या मेळाव्यातून ५ हजारांहून अधिक रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती रोजगार आणि कामगार आयुक्त राजू गावस यांनी दिली. दरम्यान, हा रोजगार मेळावा अगोदर केवळ एक दिवस घेण्याचे ठरले होते; मात्र मोठ्या संख्येने नावनोंदणी झाल्याने आता दोन दिवस हा मेळावा होणार आहे.
राज्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी १५५ खासगी कंपन्यांना एका छताखाली आणले जाणार असल्याचे राजू गावस यांनी सांगितले. ताळगाव पठारावरील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिअमवर ही नोकरभरती प्रक्रिया होणार आहे. सुमारे ५ हजार नोकर्यांची संधी उपलब्ध असून, त्यासाठी १४ हजारांहून अधिक युवक-युवतींनी नावनोंदणी केली आहे. हा आकडा अखेरपर्यंत १५ हजारांवर जाण्याची शक्यता गावस यांनी व्यक्त केली. मोठ्या संख्येने युवक-युवतींनी नावनोंदणी केली असल्याने या उमेदवारांची गैरसोय होऊ नये, यासाठी ही नोकरभरती प्रक्रिया एका दिवसावरून दोन दिवसांवर नेण्यात आलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.
दि. ८ रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत, तर बुधवार दि. ९ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ या दरम्यान राज्यात कार्यरत असलेल्या विविध कंपन्या, संस्था आणि आस्थापने नोकरभरती करणार आहेत.
दरम्यान, राज्यातील बहुतांश युवक-युवतींचा ओढा हा सरकारी नोकरीकडे असतो; मात्र बेरोजगारांच्या तुलनेत सरकारी नोकर्या फारच कमी आहेत. त्यामुळे राज्य सरकार खासगी क्षेत्रात या बेरोजगारांना रोजगार संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी खासगी कंपन्यांना एकत्र आणून या बेरोजगारांना नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी सरकारने हा रोजगार मेळावा आयोजित केला आहे.
कुशल बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी : मोन्सेरात
राज्य सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या महानोकरभरती मेळाव्यात राज्यातील कुशल बेरोजगार युवकांना रोजगार मिळवण्याची मोठी संधी आहे. या संधीचा बेरोजगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार आणि रोजगारमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी केले.
राज्यात १ लाख ४० हजार बेरोजगार
१५ लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात १ लाख ४० हजार एवढे बेरोजगार युवक-युवती असल्याची नोंद रोजगार विनिमय केंद्राकडे आहे, अशी माहिती रोजगार आणि कामगार आयुक्त राजू गावस यांनी दिली. एवढी बेरोजगारी हे एक मोठे आव्हान असून, युवा वर्गाने रोजगारासाठीच्या वेगवेगळ्या पर्यायांचा आता विचार करायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.