रॉयल्सची हाराकिरी; कॅपिटल्सचा विजय

0
253

मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे राजस्थान रॉयल्सला काल बुधवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १३ धावांनी पराभव पत्करावा लागला. दिल्लीने विजयासाठी ठेवलेले १६२ धावांचे आव्हान राजस्थानला पेलवले नाही. त्यांना २० षटकांत ८ बाद १४८ धावांपर्यंतच पोहोचता आले. इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या मोसमातील हा सामना डीएससी स्टेडियमवर झाला.

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने हाराकिरी करत पराभव स्वीकारला. बेन स्टोक्स व जोस बटलर यांनी केवळ ३ षटकांत ३७ धावांची सलामी दिली. नॉर्केे टाकलेल्या डावातील तिसर्‍या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बटलरने षटकार लगावला. चौथ्या व पाचव्या चेंडूवर चौकार ठोकत बटलरने नॉर्केच्या वेगाचा पुरेपूर वापर केला. परंतु, ताशी १५५ किलोमीटर वेगाने टाकलेल्या सहाव्या चेंडूवर नॉर्केने बटलरचा त्रिफळा उडवून दिल्लीला पहिले यश मिळवून दिले. अश्‍विनने धोकादायक स्मिथ (१) याचा स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेतला. बटलरने ४१ धावांची समयोचित खेळी केली. दहाव्या षटकाअखेर राजस्थानचा संघ २ बाद ८५ अशा भक्कम स्थितीत होता. ६० चेंडूंत केवळ ७७ धावांची आवश्यकता त्यांना होती व त्यांचे ८ गडी शिल्लक होते. संघाला १६ चेंडूंत २७ धावांची गरज असताना नॉर्केने स्थिरावलेला उथप्पाला बाद केले. यानंतर रबाडाने अचूक मारा करत राजस्थानच्या फलंदाजांना जखडून ठेवले. शेवटच्या षटकात २२ धावांची आवश्यकता असताना देशपांडेने केवळ ८ धावा दिल्या.

तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. या सामन्यासाठी त्यांनी हर्षल पटेलच्या जागी मुंबईचा जलदगती गोलंदाज तुषार देशपांडे याला संधी दिली. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने आपला मागील सामन्यातील संघच कायम ठेवला. दिल्लीच्या डावाची सुरुवात भयावह झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ याला डावातील पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचित करत आर्चरने राजस्थानला पहिले यश मिळवून दिले. तिसर्‍या क्रमांकावर उतरलेला अजिंक्य रहाणे सलग दुसर्‍या सामन्यात अपयशी ठरला. मुंबईविरुद्ध केवळ १५ धावा केलेल्या रहाणेला केवळ दोन धावांचे योगदान काल देता आले. शिखर धवन व कर्णधार श्रेयस अय्यर यांनी संघाचा कोसळता डोलारा सावरताना डावाला उभारी दिली. या द्वयीने तिसर्‍या गड्यासाठी ८५ धावांची भागीदारी रचली. अर्धशतकानंतर रिव्हर्स स्वीपचा फटका खेळून चौकार वसूल करण्याच्या प्रयत्नात धवन ‘शॉर्ट थर्ड मॅन’ला झेलबाद झाला. धवनने ३३ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार व २ षटकारांसह ५७ धावा जमवल्या. श्रेयसने ४३ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५३ धावा केल्या. मार्कुस स्टोईनिस व आलेक्स केरी यांना शेवटच्या षटकांत वेगाने धावा जमवण्यात अपयश आले. शेवटच्या पाच षटकांत दिल्लीला केवळ ३२ धावा करता आल्या. त्यामुळे निर्धारित २० षटकांत त्यांना ७ बाद १६१ धावांपर्यंतच मजल मारता आली.

धावफलक
दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ त्रि. गो. आर्चर ०, शिखर धवन झे. त्यागी गो. गोपाळ ५७, अजिंक्य रहाणे झे. उथप्पा गो. आर्चर २, श्रेयस अय्यर झे. आर्चर गो. त्यागी ५३, मार्कुस स्टोईनिस झे. तेवतिया गो. आर्चर १८, आलेक्स केरी झे. आर्चर गो. उनाडकट १४, अक्षर पटेल झे. त्यागी गो. उनाडकट ७, रविचंद्रन अश्‍विन नाबाद ०, अवांतर १०, एकूण २० षटकांत ७ बाद १६१
गोलंदाजी ः जोफ्रा आर्चर ४-०-१९-३, जयदेव उनाडकट ३-०-३२-२, कार्तिक त्यागी ४-०-३०-१, बेन स्टोक्स २-०-२४-०, श्रेयस गोपाळ ४-०-३१-१, राहुल तेवतिया ३-०-२३-०
राजस्थान रॉयल्स ः बेन स्टोक्स झे. ललित गो. देशपांडे ४१, जोस बटलर त्रि. गो. नॉर्के २२, स्टीव स्मिथ झे. व गो. अश्‍विन १, संजू सॅमसन त्रि. गो. अक्षर २५, रॉबिन उथप्पा त्रि. गो. नॉर्के ३२, रियान पराग धावबाद १, राहुल तेवतिया नाबाद १४, जोफ्रा आर्चर झे. रहाणे गो. रबाडा १, श्रेयस गोपाळ झे. ललित गो. देशपांडे ६, अवांतर ५, एकूण २० षटकांत ८ बाद १४८
गोलंदाजी ः कगिसो रबाडा ४-०-२८-१, तुषार देशपांडे ४-०-३७-२, ऍन्रिक नॉर्के ४-०-३३-२, रविचंद्रन अश्‍विन ४-०-१७-१, अक्षर पटेल ४-०-३२-१