राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता

0
255

येथील हवामान विभागाने बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे आज गुरुवार दि. १५ ऑक्टोबर रोजी राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली असून रेड अलर्ट जारी करून अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून राज्यात पाऊस पडत आहे. मागील पाच दिवसांत २.७३ इंच पावसाची नोंद झाली असून ऑक्टोबर महिन्यात आत्तापर्यंत ३.७४ इंच पावसाची नोंद झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातील पाऊससुद्धा सरासरीच्या जवळ येऊन ठेपला असून केवळ ४ टक्क्यांची कमतरता आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे कोसळत असलेला पाऊस उत्तर कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्राच्या काही भागापर्यंत येऊन पोहोचला असून पावसाची अरबी समुद्राच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याने गोवा, कोकण या भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे ढग निर्माण झालेले दिसून येत आहेत. गोव्यातील काही भागात आज १५ रोजी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चोवीस तासांत साधारण पाच इंच पाऊस कोसळू शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात चोवीस तासांत पेडणे, वाळपई, साखळी या भागात जोरदार पाऊस कोसळला. या महिन्यात पेडणे येथे आत्तापर्यंत ६.१८ इंच, काणकोण येथे ५.९२ इंच, वाळपई येथे ५.१८ इंच पावसाची नोंद झाली आहे.