रेशन दुकानांवर आजपासून कांद्यांचे वितरण

0
242

>> मंत्री गावडे यांची माहिती, दोन टप्प्यांत महिन्याला ३ किलो

राज्यातील रेशन कार्डधारकांना महिना प्रत्येकी ३ किलो कांद्याचे वितरण गुरुवारपासून सुरू केले जाणार आहे. नागरी पुरवठा खात्याकडून नाशिक येथून कांदा खरेदी केला जात आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ७५ मॅट्रिक टन कांदा दाखल झाला आहे, अशी माहिती नागरी पुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

रेशन कार्डावरील कांदा विक्रीमुळे दरवाढीमुळे त्रस्त बनलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मंत्री गावडे यांनी रेशनकार्डद्वारे कांद्यांच्या वितरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. नाशिक येथील भारतीय राष्ट्रीय शेतकरी सहकारी मार्केटिंग फेडरेशनकडून कांद्यांची खरेदी केली जात आहे. रेशनकार्डच्या माध्यमातून विक्री करण्यात येणारा कांदा राज्यातील गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यात मदत होणार आहे. गोवा फलोत्पादन मंडळातर्फे वितरित करण्यात येणारा कांदा सर्वसामान्य लोकांना मिळत नाही, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.

आगामी काळात रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना अनुदानित दरात कांदा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी कांदा विक्रीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. अनुदानित स्वरूपात ३५ रुपयांपर्यंत कांद्याची विक्री केली जाणार आहे. आगामी काळात रेशन कार्डधारकांना ५ किलोपर्यंत कांदा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात १ किलो कांदे
राज्यातील सर्व रेशन कार्डधारकांना १५ नोव्हेंबरपूर्वी पहिल्या टप्प्यात १ किलो कांदा ३४.५० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध करून जाणार आहे. राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना गोदामातून कांदा उचलण्याची सूचना बुधवारी करण्यात आली. नाशिक येथील नाफेड या संस्थेकडून मागविण्यात आलेला कांद्याचा पूर्ण कोटा प्राप्त झाल्यानंतर रेशन कार्डधारकांना महिन्यातील शिल्लक २ किलो कांद्यांचा पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याचे संचालक सिद्धिविनायक नाईक यांनी दिली.

कांद्याचे भाव चढेच
राज्यात खुल्या बाजारात ८० ते १०० रुपयांपर्यंत कांद्यांची विक्री केली जात आहे. फलोत्पादन मंडळाची भाजी विक्री केंद्र आणि मार्केटिंग फेडरेशनच्या भाजी विभागात ७०-७५ रुपये प्रति किलोच्या आसपास कांद्यांची विक्री केली जात आहे. सरकारने गतवर्षी कांद्यांच्या दरवाढीच्या वेळी फलोत्पादन मंडळाच्या भाजी विक्री केंद्रातून कांद्याची विक्री केली होती.