कोरोनाने बुधवारी राज्यात ८ मृत्यू

0
238

>> नोव्हेंबरच्या चार दिवसांत २२ बळी

राज्यात चोवीस तासांत आणखी ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला असून नवे १८३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नोव्हेंबर महिन्याच्या चार दिवसांत कोरोनाने २२ जणांचा बळी घेतला असून मृतांची एकूण संख्या ६२६ झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ३७२ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या २१३५ एवढी झाली आहे.
काल बांबोळीतील गोमेकॉमध्ये ५ कोरोना रुग्ण, मडगाव ईएसआय इस्पितळात २ रुग्ण आणि उत्तर गोव्यातील एका खासगी इस्पितळात एका रुग्णाचा मृत्यू झाला. खासगी इस्पितळात दाखल केलेल्या कोरोना रुग्णाचा केवळ १३ तासांत मृत्यू झाला. आठ मृतामध्ये सावंतवाडी आणि रत्नागिरीतील दोघांचा समावेश आहे. म्हापसा येथील ६५ वर्षीय पुरुष, उसकई येथील ७६ वर्षीय महिला, नावेली येथील ६७ वर्षीय पुरुष, केरी सत्तरीतील ४२ वर्षीय पुरुष, चिंबलमधील ६० वर्षीय महिला, नावेली येथील ५५ वर्षीय पुरुष, तसेच रत्नागिरी येथील ६२ वर्षीय महिला आणि सावंतवाडी येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

२४९ जण कोरोनामुक्त
राज्यात काल आणखी २४९ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१हजार ६११ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.७८ टक्के एवढे आहे. बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत १८८१ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या आणखीन १२५ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन ३३ कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.

पणजीत नवे ६ रुग्ण
पणजी परिसरात नवीन ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १४६ झाली आहे. उत्तर गोव्यात चिंबल येथे १४९ कोरोना रुग्ण आहेत. कोलवाळ ११५, कांदोळी येथे १०५, खोर्ली १०३ पर्वरी येथील रुग्ण संख्या ९७ एवढी आहे. दक्षिण गोव्यात मडगाव परिसरात १७३ रुग्ण आहेत. फोंडा येथे १२१ रुग्ण, वास्को येथे १०६ रुग्ण आहेत.