‘रूबी’च्या बिल्डरांना एका वर्षानंतर अटक

0
76

मुंबईहून आज गोव्यात आणणार
काणकोण येथील रूबी रेसिडेन्सी इमारतीचे फरारी बिल्डर प्रदीप सिंग बिरिंग व जयदीप सहगल यांना काल संध्या. ४च्या दरम्यान गुन्हा अन्वेषण पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने वाशी येथे अटक केली. गेल्या सुमारे वर्षभरापासून हे बिल्डर फरारी होते व पोलीस त्यांच्या शोधात होते. त्यांना पकडण्यासाठी इंटरपोलचीही पोलिसांनी मदत घेतली होती. पण त्यांचा सुगावा लागू शकला नव्हता.
दरम्यान, मध्यंतरी प्रदीप सिंग बिरिंग हा ब्रिटनमधील मँचेस्टर येथे असल्याची माहिती इंटरपोलने सीबीआय्‌मार्फत पोलिसांना दिली होती.गुन्हा अन्वेषण पोलीस विभागातील निरीक्षक सिध्दांत शिरोडकर व उपनिरीक्षक लक्षी आमोणकर व त्यांच्या सहकार्‍यांनी विभागाचे अधिक्षक कार्तिक कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
मुंबईतील एका खबर्‍याकडून वरील दोन्ही बिल्डर्स मुंबईत असल्याची माहिती मिळाली होती. नंतर आम्ही नवी मुंबई पोलिसांची मदत घेतली व वाशी येथे दुपारी ४ वाजता त्यांना पकडण्यात यश आल्याचे ते म्हणाले.
आज दुपारी त्यांना गोव्यात आणण्यात येणार असून नंतर कोर्टापुढे उभे केले जाईल.