रुग्णसंख्या रोखण्यावर
भर द्या : सुदिन ढवळीकर

0
19

राज्य सरकारने राज्यातील कोरोनाबाधितांच्या पार्श्‍वभूमीवर गाफील राहू नये. अन्यथा, कोरोना महामारीची परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याने त्याबाबत वेळीच योग्य नियोजन करावे. सरकारी इस्पितळात प्राणवायूसाठी रुग्णांचा बळी जाऊ नये याचीही सरकारने काळजी घ्यावी, असे आवाहन मगोपचे ज्येष्ठ नेते, मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत केले.

नववर्ष आणि नाताळनिमित्त पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सनबर्न, डान्स बार, पार्ट्या तेजीत सुरू आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. सरकारने सतर्कता बाळगत यावर उपाययोजना हाती घ्याव्यात. कोरोनाबाधितांची संख्या रोखण्यासाठी कडक मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी मागणी आमदार ढवळीकर यांनी केली.

मोठ्या प्रचारसभांवर
आयोगाने बंदी घालावी
निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक प्रचारासाठी मोठ्या सभा घेण्यास बंदी घालावी. एका प्रभागात शंभरच्या आसपास लोकांची सभा घेण्यास मान्यता द्यावी. निवडणूक सभा घेण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना समानता द्यावी, अशी ढवळीकर यांनी मागणी केली. विधानसभा निवडणुकीच्या जाहीर सभांवर बंदी घालण्याची गरज आहे. राजकीय पक्षांना लहान लहान सभा घेण्यास मुभा द्यावी. निवडणूक सभांसाठी खास मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात. प्रचारसभांना मान्यता देताना सर्व राजकीय पक्षांना समान न्याय द्यावा. अशीही मागणी यावेळी आमदार ढवळीकर यांनी केली,

राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या एक हजारांवर

>> चोवीस तासांत राज्यात २१२ रुग्ण

>> सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या १०४६

राज्यात नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ कायम असून गेल्या चोवीस तासांत नवीन २१२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, एका बळीची नोंद झाली आहे. राज्यातील बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ६.९३ टक्के एवढे आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १०४६ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३५२२ एवढी झाली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनला आहे. सक्रिय रूग्णांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन ३०५८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील २१२ नमुने बाधित आढळून आले.

राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी २१ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४७ टक्के एवढे खाली आले आहे. कोरोनाची लक्षणे जाणवल्याने तीन बाधितांना इस्पितळात दाखल करून घेण्यात आले आहे. तर, बर्‍या झालेल्या एकाला इस्पितळांतून घरी पाठविण्यात आले आहे.
पणजीत सर्वाधिक रुग्ण
राजधानी पणजीसह पर्वरी, मडगाव, चिंबल, कासावली, कांदोळी, कुठ्ठाळी, फोंडा आदी भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. पणजीतील बाधितांची संख्या सर्वाधिक १२० एवढी झाली आहे. मडगाव येथे ११२, कासावली येथे ९१, पर्वरी येथे ६५, चिंबल येथे ४५, शिवोली येथे ४१, कुठ्ठाळी येथे ६९, लोटली येथे ४८, म्हापसा येथे ५३, फोंडा येथे ३९ बाधित आहेत.