>> सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरण
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी समन्स पाठवलेल्या गोव्यातील हॉटेल व्यावसायिकाने सुशांतसिंह राजपूत याच्याबरोबर आपली कधीच भेट झाली नसल्याचा दावा केला आहे, मात्र रिया चक्रवर्तीशी भेट झाल्याची कबुली दिली आहे.
अमलबजावणी संचालनालय आज सोमवारी सदर व्यावसायिकाची सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी चौकशी करणार आहे. चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सदर व्यावसायिक काल गोव्यातून मुंबईकडे रवाना झाला. जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना, आपली आणि अभिनेता राजपूत यांची कधीही भेट झाली नव्हती, असा दावा त्याने केला. मात्र, २०१७ साली राजपूत यांची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याशी आपली भेट झाली होती, असे त्याने सांगितले.
राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी जे अमली पदार्थांचे धागेदोरे आहेत ते सदर व्यावसायिकाशी जुळतात, त्यामुळे संचालनालयाला चौकशीसाठी हवा आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा १४ जून रोजी मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली याचा तपास सीबीआयतर्फे चालू आहे, तर रिया चक्रवर्तीच्या संशयास्पद स्वरूपाच्या व्हॉटस् ऍप चॅटच्या आधारे अमलबजावणी संचालनालयाने सदर व्यावसायिकास चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले आहे.