राहुल देसाईच्या घराची एसआयटीकडून झडती

0
9

>> महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात

जमीन हडप प्रकरणाची चौकशी करणार्‍या गोवा पोलिसांच्या एसआयटीने हणजूण येथील जमीन हडप प्रकरणी अटक केलेल्या बार्देशच्या तत्कालीन मामलेदार राहुल देसाई याच्या करंझाळे पणजी येथील घराची सुमारे पाच तास झडती काल घेतली आहे. एसआयटीच्या पथकाने या झडतीमध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

एसआयटीने बार्देशचे तत्कालीन मामलेदार राहुल देसाई याला २९ सप्टेंबर २०२२ रोजी अटक करून तीन दिवसांचा रिमांड घेतला आहे. त्याच्यावर जमीन हडप करण्यासाठी साहाय्य केल्याचा आरोप आहे. एसआयटीकडून मामलेदार देसाई याची बँक खाती, मालमत्ता व इतर बाबतीत चौकशी केली आहे.

मामलेदार देसाई याला म्हापसा येथील न्यायालयात सोमवारी हजर केला जाणार आहे. एसआयटीने मामलेदार देसाई याच्याविरोधात जमीन हडप प्रकरणी २ गुन्हे दाखल केले आहेत. एसआयटीने मामलेदार देसाई याला अटक केल्यानंतर राजकुमार मेथी आणि बार्देश मामलेदार कार्यालयातील वाहन चालक योगेश वझरकर याला अटक केली आहे.