पश्चिम बंगालमधील निवडणुकीत ज्या मतदारसंघांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या, त्या दोन्ही मतदारसंघांतील कॉंग्रेस उमेदवारांचे निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले आहे. कॉंग्रेस – डावे पक्ष यांच्या तिसर्या आघाडीच्या जवळजवळ ८५ टक्के उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे. तिसर्या आघाडीच्या उमेदवारांना पश्चिम बंगालमधील २९२ पैकी केवळ ४२ मतदारसंघांमध्ये आपली अनामत वाचवता आली.
उमेदवाराला एकूण मतदानाच्या १६.५ टक्के मतेही मिळू शकली नाहीत तर त्याची अनामत रक्कम जप्त होते. कॉंग्रेस तसेच डाव्या पक्षांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. इंडियन सेक्युलर फ्रंट ह्या तिसर्या आघाडीतील घटक पक्षाला मात्र एक जागा मिळाली. आपल्या दोन्ही मित्रपक्षांपेक्षा इंडियन सेक्युलर फ्रंटने चांगली कामगिरी बजावली आहे.
राहुल गांधी यांनी माटिगारा – नक्षलबाडी व गोलपोखर ह्या दोन मतदारसंघांमध्ये १४ एप्रिल रोजी प्रचारसभा घेतल्या होत्या. त्या दोन्ही मतदारसंघांतील कॉंग्रेसच्या उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे. कॉंग्रेसपाशी माटिगारा – नक्षलबाडी मतदारसंघ गेली दहा वर्षे होता, परंतु ह्यावेळी विद्यमान कॉंग्रेस आमदार शंकर मलाकर हे तिसर्या स्थानी फेकले गेले. त्यांना जेमतेम ९ टक्के मते मिळाली.
गोलपोखर मतदारसंघातही कॉंग्रेस उमेदवार तिसर्या जागी फेकला गेला. त्याला १२ टक्के मतेच मिळू शकली. हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे २००६ ते २००९ व नंतर २०११ ते २०१६ ह्या काळात होता.