दक्षिण गोव्यात महामार्गाचे चौपदरीकरण लवकरच
राष्ट्रीय महामार्ग-66चे उत्तर गोव्यात चौपदरीकरण झालेले असले तरी दक्षिण गोव्यात मात्र या महामार्गाच्या बऱ्याच भागाचे चौपदरीकरण होणे बाकी आहे. आता या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने दक्षिण गोव्यातील या शिल्लक राहिलेल्या कामासाठी 1376 कोटी रु. मंजूर केले आहेत. या निधीतून राष्ट्रीय महामार्ग-66चे दक्षिण गोव्यातील 22.10 कि.मी. एवढे काम हाती घेऊन ते पूर्ण करण्यात येणार आहे. त्यात केपे तालुक्यातील बाळ्ळीपासून काणकोण तालुक्यातील बगल मार्ग सुरू होईपर्यंतचा भाग तसेच काणकोण येथील मनोहर पर्रीकर बगल मार्गाच्या टोकापासून पोळे येथील कर्नाटक राज्याच्या सीमेपर्यंतच्या भागाचा समावेश आहे.
सध्याच्याच मार्गाचे रूंदीकरण : तवडकर
दरम्यान, या पार्श्वभूमीवर काल आमच्या प्रतिनिधीने काणकोण मतदारसंघाचे आमदार व सभापती रमेश तवडकर यांना यासंबंधी विचारले असता ते म्हणाले की बोगदा खोदून रस्ता नेण्याचा प्रस्ताव केंद्रीय यांत्रिक समितीने फेटाळला आहे. त्यामुळे सध्याच्याच मार्गाचे रूंदीकरण करून तो चारपदरी मार्ग करण्यात येणार आहे. त्यासाठी कटमल घाट येथील सर्व वळणे कापून टाकण्यात येतील. त्यामुळे या मार्गाचे रूंदीकरण तर होईलच. शिवाय काणकोण ते मडगावपर्यंतचे अंतरही कमी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 1375 कोटी रु. एवढा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या या मार्गाचे काम आता हाती घेण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.
सभापती रमेश तवडकर यांनी दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेऊन या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्याची त्यांना विनंती केली होती आणि गडकरी यांनी ती मागणी मान्यही केली होती. आता हा निधी मंजूर करण्यात आल्याबद्दल तवडकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.