धारगळ येथे राष्ट्रीय आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार संस्था उभारण्यासाठी राज्य सरकारने जागेचे हस्तांतरण आयुष मंत्रालयाकडे एका कार्यक्रमात काल केले आहे. या ठिकाणी प्रकल्प उभारणीसाठी निविदेच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून येत्या ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रकल्पाच्या बांधकामाचे भूमीपूजन करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
धारगळ येथे राष्ट्रीय आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार संस्था उभारणीचे काम जागा ताब्यात नसल्याने रखडले होते. आता जागा आयुष मंत्रालयाच्या ताब्यात मिळाल्याने कामाला गती मिळणार आहे. जमीन हस्तांतरण कार्यक्रमाला आयुष मंत्रालयाचे सचिव आणि गोवा सरकारच्या आरोग्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते, असेही मंत्री नाईक यांनी सांगितले.
धारगळ येथे महामार्गाच्या बाजूला साधारण ५० एकर जमिनीत १०० खाटांचे हॉस्पिटल, महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. साधारण एक हजार कोटी खर्चाचा हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. या ठिकाणी आयुर्वेद संस्था आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. या प्रकल्पाबाबत राज्य सरकारशी करार करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जागेच्या हस्तांतरणाला मान्यता देण्यात आलेली आहे.
या भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये आयुर्वेद, योग, निसर्गोपचार या विषयी संशोधन विभाग, इस्पितळ व पदव्युत्तर अभ्यासक्रम असे विभाग असतील. हा अभ्यासक्रम अखिल भारतीय पातळीवर असून त्यामध्ये गोमंतकीयांना राखविता ठेवली जाणार आहे. योग विभागामार्फत गोव्यातील आरोग्य पर्यटनाला चालना देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.