राष्ट्रवादी विरोधकाची भूमिका बजावणार

0
114

>> महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेने सरकार स्थापन करावे ः शरद पवार

महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी काल पत्रकार परिषदेत जाहीर केले. तसेच सरकार स्थापनेचा जनादेश मिळालेल्या भाजप व शिवसेना यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करावे, अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली.

शिवसेन नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी कॉंग्रेसच्या बाहेरून पाठिंब्यासह शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकार स्थापन करण्याची शक्यता फेटाळून लावली.
पवार म्हणाले, ‘आम्ही सरकार स्थापन करण्याचा प्रश्‍न येतोच कुठे? भाजप व शिवसेना यांची गेली २५ वर्षे युती आहे आणि ते आज – उद्या एकत्र येतील’ आमच्याकडे सरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ असते तर आम्ही कोणाचीही वाट पाहिली नसती. कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी १०० पेक्षा जास्त जागा मिळवलेल्या नाहीत… अशा वेळी आम्ही जबाबदार विरोधकाची जबाबदारी पार पाडणार आहोत, असे पवार यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले.

भाजप आणि शिवसेना यांना सरकार स्थापनेचा आदेश मतदारांनी दिलेला आहे. त्यामुळे त्यांनी विनाविलंब नवे सरकार स्थापन करून राज्यात कोणताही घटनात्मक पेच निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. जनतेने आम्हाला जो आदेश दिला आहे तो निभावण्याची संधी भाजप-शिवसेनेने आम्हाला द्यावी अशा शब्दात पवार यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

पुन्हा मुख्यमंत्री होण्यात
स्वारस्य नाही ः पवार
आपण पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुनरागमन करणार असल्याबाबत वर्तविले जाणार तर्कही पवार यांनी फेटाळले. ‘मी चार वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे आणि आता मला त्या पदाबाबत स्वारस्य राहिलेले नाही’ असे पवार म्हणाले.

भाजप नेते आज भेटणार राज्यपालांना
महाराष्ट्र सरकारमधील एक मंत्री मुनगंटीवार यांनी राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा संपण्याचे संकेत दिले असून आज भाजप नेते या विषयावर राज्यपालांना भेटणार असल्याचे सांगितले. आमचा फॉर्म्युला ठरला आहे. जी नाराजी आहे ती दूर होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला जनादेश दिलेला आहे. त्यामुळे सरकार आमचेच येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व आपण आज (गुरुवारी) राज्यपालांची भेट घेणार आहोत, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.