राष्ट्रवादी कॉंग्रेस करणार समविचारींशी युती ः मलीक

0
85

गोव्यातील जनतेला राज्यात परिवर्तन झालेले हवे असून या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यातील समविचारी पक्षांबरोबर युती करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक नवाब मलीक यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना सांगितले.

पुढील आठवड्यात गोव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे एक संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. राज्यातील जनतेला येथे परिवर्तन झालेले हवे असून भाजप सरकारने आश्‍वासने देऊन विश्‍वासघात केल्याबद्दल जनता त्यांच्यावर नाराज असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील जनतेला ‘अच्छे दिन’ची केवळ स्वप्ने दाखवल्याचे ते म्हणाले.
गोव्याबरोबरच गुजरात व पंजाब येथेही लोकांना परिवर्तन झालेले हवे आहे. आसाम राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर येणार असल्याचे जे अंदाज बांधले जात आहेत ते खोटे ठरणार असल्याचे ते म्हणाले. गोव्यातील प्रत्येक मतदारसंघात पक्ष बळकट करण्यासाठी आता काम हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
निळकंठ, ट्रोजनचा निर्णय वैयक्तिक
दरम्यान, निळकंठ हळर्णकर व ट्रोजन डिमेलो या नुकत्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांसंबंधी पत्रकारांनी विचारले असता पक्ष सोडण्याचा त्यांचा निर्णय हा वैयक्तिक होता. पक्ष सोडून असे कित्येक नेते जात असतात, असे मलीक म्हणाले. पत्रकार परिषदेला पक्षाचे अध्यक्ष जुझे ङ्गिलीप डिसोझा व पदाधिकारी अविनाश भोसले हे हजर होते.

पार्सेकर डमी मुख्यमंत्री
गोव्यात लक्ष्मीकांत पार्सेकर हे ‘डमी’ मुख्यमंत्री असून राज्याचा कारभार अजूनही मनोहर पर्रीकर हेच सांभाळत आहेत. आणि केंद्रात संरक्षण मंत्री असलेले पर्रीकर हे त्याचसाठी दर शनिवारी गोव्यात येत असल्याचे मलीक म्हणाले. गुजरातमध्येही तीच स्थिती असून आनंदीबेन पटेल या केवळ नावाला मुख्यमंत्री असून गुजरात राज्याचा कारभार हा नरेंद्र मोदीच चालवत असल्याचा आरोप मलीक यांनी केला.