राष्ट्र निर्मितीत, महात्मा गांधीजींचे विचार आजही संयुक्तिक आहेत. गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या संदेशावर चिंतन आणि मनन करणं हा आपल्या दिनचर्येचा एक भाग राहायला हवा. सत्य आणि अहिंसेचा त्यांचा संदेश, आजच्या काळात अधिकच आवश्यक झाला आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
कायदे मंडळ, प्रशासन आणि न्याय व्यवस्था ही आधुनिक राष्ट्राच्या शासन व्यवस्थेची तीन महत्वाची अंग आहेत. या तिन्ही यंत्रणा स्वायत्त असूनही परस्परांशी जोडलेल्या आणि परस्परपूरकही आहेत. मात्र, राष्ट्राची उभारणी होते ती लोकांमुळेच. आम्हा भारतीयांच्याच हाती प्रजासत्ताकाचं सूत्र असतं. आपलं सामूहिक भविष्य घडवण्याची खरी शक्ती भारताच्या लोकांमध्येच सामावलेली आहे.
आपल्या संविधानानं, एक स्वतंत्र लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून आपल्याला अधिकार प्रदान केले आहेत. त्याचबरोबर न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुभाव या आपल्या लोकशाहीच्या महत्वाच्या तत्वांशी सदैव बांधील राहण्याची जबाबदारीही आपल्यावर सोपवली आहे. राष्ट्राचा अखंड विकास आणि बंधुभाव राखण्यासाठी हाच उत्तम मार्ग आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जीवनमूल्ये आपण अंगिकारली तर या संविधानिक मूल्यांचं आचरण आपल्यासाठी अधिकाधिक सुलभ होत राहील. या आचरणातूनच महात्मा गांधीजींची १५० वी जयंती आपण खर्या अर्थानं साजरी करु.
प्राचीन काळात, नालंदा आणि तक्षशीला विद्यापीठांच्या उभारणीतच, सर्वोत्तम शिक्षण संस्थेचा पाया घातला गेला. भारतात, शक्ती, प्रसिद्धी आणि श्रीमंतीपेक्षा ज्ञान हे नेहमीच मौल्यवान मानलं जातं. भारतीय परंपरेत, शिक्षण संस्थांना, विद्येचं मंदिर मानलं जातं. वसाहतवाद्यांच्या दीर्घ राजवटीमुळे राहीलेलं मागासलेपण दूर करण्यासाठी, शिक्षण हेच सबलीकरणाचं प्रभावी माध्यम ठरलं आहे. स्वातंत्र्यानंतर लगेचच आपल्या आधुनिक शिक्षण व्यवस्थांचा विकास सुरु झाला, तेव्हा मर्यादित संसाधनं असूनही शिक्षण क्षेत्रातली आपली कामगिरी उल्लेखनीय आहे. कोणतेही मूल अथवा युवक शिक्षणापासून वंचित राहू नये हाच आमचा कसोशीचा प्रयत्न आहे. त्याच बरोबर, आपल्या शिक्षण व्यवस्थेत सातत्यानं सुधारणा करत आपली शिक्षण व्यवस्था जागतिक तोडीची करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करत राहायला हवेत.
इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. मिशन गगनयान मधे इस्रो प्रगती करत आहे, या वर्षात, भारतीय मानव अंतराळ यान कार्यक्रम अधिक वेगानं पुढे जाण्याची, सर्व देशवासीय मोठ्या उत्सुकतेनं प्रतिक्षा करत आहेत.
देशाची सशस्त्र दलं, अर्धसैनिक दलं आणि अंतर्गत सुरक्षा दलांची मी मुक्त कंठानं प्रशंसा करत आहे. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी त्यांचं बलिदान म्हणजे, अद्वितीय शौर्य आणि शिस्तबद्धतेची अजोड गाथाच आहे. आपले शेतकरी, डॉक्टर आणि परिचारिका, विद्या आणि संस्कार देणारे शिक्षक, वैज्ञानिक आणि अभियंते, सळसळत्या उत्साहाचे कर्तृत्ववान युवक, आपल्या मेहनतीनं कारखाने चालवणारा श्रमजीवी वर्ग, औद्योगिक विकासात योगदान देणारे उद्योजक, आपली संस्कृती आणि कला समृध्द करणारे कलाकार, भारताच्या सेवा क्षेत्राला जगभरात सन्मानाचं स्थान देणारे व्यावसायिक, इतर अनेक क्षेत्रात आपलं योगदान देणारे सर्व देशवासीय आणि विशेषकरून अडथळे असूनही यशाचे नवे मापदंड स्थापन करणार्या आमच्या झुंजार कन्या, हे सर्व आपल्या देशाचा गौरव आहेत.
विविध क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करणार्या काही व्यक्तींना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मला या महिन्याच्या सुरुवातीला मिळाली. साधेपणानं आणि निष्ठेनं, शांतपणे कार्य करत यांनी विज्ञान आणि नवनिर्मिती, शेती आणि वनीकरण, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, प्राचीन कलांचं पुनरुज्जीवन, दिव्यांग व्यक्ती, महिला आणि बालकांचं सशक्तीकरण, गरजूंना मोफत भोजन अशा विविध क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे. उदाहरणादाखल, जम्मू- काश्मीर मधे आरिफा जान यांनी नमदा हस्तकलेचं, पुनरुज्जीवन करण्यासाठी, तेलंगणामधे रत्नावली कोटपल्ली यांनी थेलेसिमियाग्रस्त लोकांच्या उपचारासाठी, केरळ मधे देवकी अम्मा यांनी वैयक्तिक प्रयत्नातून वनसंपदेचा विकास करून, मणिपूर मधे, जामखोजांग मिसाओ यांनी सामुहिक विकासासाठी काम करून, पश्चिम बंगाल मधे बाबर अली यांनी दुर्बल वर्गातल्या मुलांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यात प्रशंसनीय योगदान देऊन लोकांच्या जीवनात नवी आशा पल्लवित केली. असे असंख्य लोक आहेत, मी फक्त मोजक्याच नावांचा उल्लेख केला. सामान्य व्यक्तीही, असामान्य योगदान देऊन समाजात मोठं परिवर्तन घडवू शकतात हे या लोकांनी सिध्द केले आहे. अशा अनेक स्वयंसेवी संस्थाही आहेत, ज्या राष्ट्र निर्मिती अभियानात आपलं योगदान देत सरकारला सहयोग करत आहेत.
आपण आता एकविसाव्या शतकाच्या तिसर्या दशकात प्रवेश केला आहे. हे दशक, नव भारत निर्मिती आणि भारतीयांच्या नव्या पिढीच्या उदयाचं राहील. या शतकात जन्मलेले युवक राष्ट्रीय विचार प्रवाहात हिरीरीने आपली जबाबदारी निभावत सहभागी होत आहेत. आपल्या महान स्वातंत्र्य लढ्यातले साक्षीदार, काळाच्या ओघात, हळूहळू आपल्याला सोडून जात आहेत. मात्र स्वातंत्र्य लढ्याप्रती आपली आस्था सदैव कायम राहील. तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे, आजच्या युवकाला व्यापक माहिती आहे आणि त्यांच्यात मोठा आत्मविश्वासही आहे. आपल्या पुढच्या पिढीचा देशाच्या मुल्यांवर अढळ विश्वास आहे. ‘राष्ट्र सर्वात आधी’ हीच आपल्या युवकांची भावना आहे. या युवकांमध्ये, मला, नव भारताची झलक पाहायला मिळतं आहे.
राष्ट्र निर्मितीत, महात्मा गांधीजींचे विचार आजही संयुक्तिक आहेत. गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या संदेशावर चिंतन आणि मनन करणं हा आपल्या दिनचर्येचा एक भाग राहायला हवा. सत्य आणि अहिंसेचा त्यांचा संदेश, आजच्या काळात अधिकच आवश्यक झाला आहे. कोणत्याही कारणासाठी संघर्ष करणार्या लोकांनी, विशेषकरून युवकांनी, गांधीजींचा अहिंसेचा मंत्र सदैव स्मरणात ठेवला पाहिजे, कारण हा मंत्र म्हणजे मानवतेला दिलेली अमुल्य देणगी आहे. कोणतंही कार्य योग्य आहे की अयोग्य हे निश्चित करण्यासाठी, गांधीजींची, मानव कल्याणाची कसोटी, आपल्या लोकशाहीलाही लागू आहे. लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचीही भूमिका महत्वाची असते. राजकीय विचारांच्या अभिव्यक्ती बरोबरच, देशाचा सर्वंकष विकास आणि देशवासीयांच्या कल्याणासाठी दोघांनीही मिळून वाटचाल करायला हवी.