जोरदार पावसामुळे कोकणातील रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर डोंगराचा काही भाग कोसळून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली. ढिगाऱ्याखालून 103 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. तर, आतापर्यंत 16 जणांचे मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी 60 हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. सध्या पावसामुळे बचावकार्य थांबवले आहे. ते आज पहाटे सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः घटनास्थळी दाखल होऊन इर्शाळवाडीच्या पायथ्याशी असून बचावकार्यावर नजर ठेवून होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी, आतापर्यंत 103 लोकांची ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आले असून 16 जणांचा मृत्यू झाला. काही नागरिक भातशेतीच्या कामासाठी इतरत्र गेले असून काही मुले आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचाही शोध घेतला जात असल्याचे सांगितले.