अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या देखरेखीखाली मंदिराच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र आता राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमिनीवरून ट्रस्टवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. २ कोटी रुपये किमतीची जमीन ट्रस्टने १८.५ कोटींना विकत घेतल्याचा आरोप आपचे खासदार संजय सिंह आणि सपाचे नेते पवन पांडे यांनी केला आहे. दरम्यान, हे सर्व आरोप ट्रस्टने फेटाळून लावले असून, त्यावर खुलासाही केला आहे.
ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने २ कोटी रुपये किंमत असणारी जमीन १८ कोटी रुपयांना खरेदी केली. हे सरळसरळ भ्रष्टाचाराचे प्रकरण असून, सरकारने याची चौकशी सीबीआय आणि ईडीमार्फत करावी, अशी मागणी संजय सिंह यांनी यांनी पत्रकार परिषदेत केली.
दुसरीकडे सपाचे नेते पवन पांडे यांनीही जमीन खरेदीत भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. राम जन्मभूमीच्या जमिनीला लागून असलेली जमीन पुजारी हरीश पाठक आणि त्यांच्या पत्नीने १८ मार्च रोजी सायंकाळी सुल्तान अन्सारी आणि रवी मोहन यांना २ कोटी रुपयांना विकली. हीच जमीन अवघ्या काही मिनिटांत चंपत राय यांनी राम जन्मभूमी ट्रस्टच्या वतीने १८.५ कोटी रुपयांना खरेदी केली. जमीन खरेदीचा सगळा खेळ महापौर आणि ट्रस्टी यांच्या संगनमताने झाला, असा आरोप पांडे यांनी केला आहे.
राजकीय द्वेषातून आरोप : चंपत राय
राम मंदिर जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्यानंतर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी यावर आपली भूमिका मांडली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मंदिरासाठी कमीत कमी दराने जमीन खरेदी केली आहे. काही राजकीय नेते लोकांची दिशाभूल करत आहेत. आरोप करणारे लोक राजकारणाशी संबंधित असून, राजकीय द्वेषातून आरोप करत आहेत, असेही ते म्हणाले.