लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजप-मनसे युतीच्या हालचालींना वेग आला आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी काल नवी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील उपस्थित होते. या भेटीनंतर मनसे-भाजप युतीवर लवकरच शिक्कामोर्तब होईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि अमित शहांमध्ये लोकसभेबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे सोमवारी रात्री उशिरा चार्टर्ड विमानाने दिल्लीसाठी रवाना झाले. त्यानंतर मंगळवारी त्यांनी अमित शहांची भेट घेतली. अमित शहांच्या भेटीनंतर राज ठाकरे मुंबईत परतले आहेत. मात्र, भाजप-मनसे युतीबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही.
राज ठाकरेंची काल अमित शहांसोबत झालेल्या भेटीत लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली. भाजप आपल्या कोट्यातील दक्षिण मुंबई ही जागा मनसेला देण्याची शक्यता आहे, तर आम्हाला दोन जागा द्याव्यात अशी मनसेची मागणी आहे. त्यामुळे या भेटीनंतर पुढे नेमके काय होणार? राज ठाकरे काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे