राज्य चित्रपट महोत्सव शुक्रवारपासून

0
97

>> एन. चंद्रा यांना देणार जीवन गौरव पुरस्कार

 

येत्या शुक्रवार दि. ५ ते रविवार दि. ७ पर्यंत आठवा राज्य चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात कोकणी व मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अशी माहिती महोत्सवाचे संयोजक सुशांत खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दि. ५ रोजी सायं. ५.३० वा. उपमुख्यमंत्री ङ्ग्रान्सिस डिसोझा यांच्याहस्ते कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात होणार आहे. यावेळी गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष दामोदर नाईक, माहिती व प्रसिद्धी खात्याचे सचिव दौलत हवालदार उपस्थित राहणार आहेत. समारोप सोहळा रविवार दि. ७ रोजी होणार असून यावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, आभिनेता सचिन पिळगावकर, वर्षा उसगावकर, मृणाल कुलकर्णी, नाना पाटेकर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय समारोप सोहळ्याला बेला शेंडे यांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘नाचुया कुम्पासार’ या चित्रपटाने होणार आहे. महोत्सवात एकूण बारा कोकणी व मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या बारा चित्रपटात होम स्वीट होम, होम स्वीट होम-२, एनिमी?, हांव तू तू हांव, ब्रेकअप, एमएमएस, नाचुया कुम्पासार, रोझ तुम, निर्मोन हे नऊ कोकणी चित्रपट, गुरू पौर्णिमा-एक लव्हेबल घोस्ट, प्रेम ऍट फर्स्ट साईट हे दोन मराठी चित्रपट तर ‘द गेस्ट’ हा लघुपट दाखविण्यात येणार आहे. कोकणी व मराठी विभागातील उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, अभिनेता, अभिनेत्री, सहअभिनेता, सहअभिनेत्री, बालकलाकार, कथा, पटकथा, संवाद, गीत, संगीत दिग्दर्शक, गायक, गायिका, सिनेमटोग्राफर, संकलक, ऑडियोग्राफी, कला दिग्दर्शक, वेशभूषा यासाठी तर नॉन फिचर चित्रपट विभागात उत्तम चित्रपट फिक्शन व नॉन फिक्शन व इतर पुरस्कार देण्यात येतील. चित्रपट विभागात एकूण ४२ पुरस्कार तर लघुपट विभागात ७ पुरस्कार देण्यात येणार आहेत अशी माहिती खेडेकर यांनी दिली. तसेच यंदाचा जीवनगौरव पुरस्कार एन. चंद्रा यांना देण्यात येणार आहे. या महोत्सवातील चित्रपट आयनॉक्स, मॅकेनिझ पॅलेस व कला अकादमीत दाखविण्यात येणार आहेत.