राज्याला पुढील 15 दिवसांसाठी पुरेल एवढा एलपीजीसाठा गोव्यात आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमादे सावंत यांनी गोवा विधानसभेत दिली. राज्याकडे एलपीजीचा किती साठा आहे त्याचा अभ्यास करुन पुढील पावले उचलण्यासाठी केंद्राने सचिव स्तरावरील तीन सदस्यीय समिती स्थापन केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
विविध राज्यांकडे एलपीजीचा किती साठा आहे त्याचा अभ्यास करुन घ्यावा, यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आजच दुपारपर्यंत आम्हाला आमच्याकडे किती साठा आहे, याची माहिती मिळणार आहे असे काल दुपारी विधानसभेत सावंत यांनी सांगितले. आमच्याकडे एलपीजीच्या किती साठा आहे त्याचे तपशील आम्ही आजच केंद्राला पाठवणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा
- >> हॉटेल, रेस्टॉरंटना फटका बसण्याची शक्यता
मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व रेस्टॉरंट चालकांना आपल्या आस्थापनातील मेनूमध्ये कपात करावी लागू शकते, असे गोवा हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष गौरीश धोंड यांनी म्हटले आहे.
राज्यात घरगुती एलपीजी सिलेंडरचा तुटवडा नसला तरी, व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा झाला आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गोवा विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारला व्यावसायिक सिलेंडरच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.