>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : कृषी संपर्क सेवा योजनेचा शुभारंभ
राज्यात नवीन ४०० युवा शेतकरी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून कृषी खात्याच्या अधिकार्यांनी केवळ कार्यालयातील कामकाजात गुंतून न राहता शेतकर्यांमध्ये मिळून मिसळून युवा शेतकरी तयार करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल येथे केले.
टोक, पणजी येथे कृषी खात्याच्या ई. कृषी संपर्क सेवा योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी कृषी सचिव कुलदीप सिंग गंगार, कृषी खात्याचे संचालक नेवील आफोन्सो यांची उपस्थिती होती.
राज्यात भाजी, फळे, फुले यांचे उत्पादन घेण्यास भरपूर वाव आहे. कृषी खात्याच्या प्रत्येक अधिकार्यांनी कार्यप्रवण व्हायला हवे. शेतकर्यांना शेतजमीन, पीक आदींची नवनवीन माहिती देऊन शेती उत्पादन वाढविण्यासाठी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शेती, भाजी, फुले, फळे आदींचे उत्पादन घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन केल्यास युवा वर्ग शेतीकडे वळू शकतो. शेतीतून जास्त उत्पादन मिळत नसल्याने अनेक युवक शेतीमध्ये रुची दाखवत नाहीत. शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते. याबाबत योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
प्रथम टप्प्यात केवळ
५० जणांची नावे निश्चित
नवीन युवा शेतकरी तयार करण्याच्या कार्याचा सप्टेंबरमध्ये आढावा घेतला जाणार आहे. प्रथम टप्प्यात केवळ ५० जणांची नावे निश्चित करून प्रयत्न केल्यास किमान १० युवा शेतकरी निश्चित तयार होऊ शकतात. युवा वर्गाला शेतीकडे वळण्यासाठी येणार्या विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी अधिकार्यांनी लक्ष द्यावे. कृषी विकासाला चालना देण्यासाठी कायद्यात दुरुस्तीबाबतच्या सूचना करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.