एमसीसी अध्यक्षपदी क्लेअर कोनोर

0
146

>> क्लबच्या २३३ वर्षांच्या इतिहासात
प्रथमच महिलेची निवड

मेरिलबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसी या क्रिकेटमधील नियम बनवणार्‍या आणि त्याचा प्रचार प्रसार करणार्‍या संस्थेने आपल्या २३३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका महिला खेळाडूची क्लबच्या अध्यक्षपदी निवड करत ‘पुरुषी’ परंपरा मोडून काढली आहे.

इंग्लंडची माजी खेळाडू आणि कर्णधार क्लेअर कोनोर हिची मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मेरिलबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) हे लंडनमधील क्रिकेट क्लब आहे. याची १७८७ साली स्थापना साली झाली. या क्लबला २३३ वर्षे पूर्ण झाली आहेत. दोनशेपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असलेल्या या क्लबने पहिल्यांदाच अध्यक्षपदाची जबाबदारी एका महिला खेळाडूंकडे सोपवली आहे. क्लेअर पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा याच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे घेतील. सध्या कुमार संगकारा मेरिलबोन क्रिकेट क्लबचा अध्यक्ष आहे .

बुधवारी क्लबची वार्षिक सर्वसाधारण बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. त्यात त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. क्लेअर कोनोर यांना आता मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या सदस्यांची मंजुरी घेणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूंच्या महामारीमुळे कुमार संगकारा यांचा एक वर्षासाठी कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. संगकारा पुढील वर्षी या पदावरून कार्यमुक्त होतील. त्यानंतर कोनोर अध्यक्षपदाचा पदभार संभाळतील. संगकारा हा एमसीसीचा पहिला ब्रिटिशेत्तर अध्यक्ष आहे. या निवडीबाबत कोनोर म्हणाल्या की, एमसीसीच्या अध्यक्षपदासाठी माझे नाव घोषित केल्याने मी खूपच आनंदित आहे. क्रिकेटने मला खूप काही दिले आहे.

या पदामुळे माझा अधिक सन्मान वाढणार आहे. ४३ वर्षीय कानोर या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या महिला क्रिकेट समितीच्या अध्यक्षदेखील आहेत. वयाच्या १९व्या वर्षी १९९५ साली इंग्लंडकडून पदार्पण केलेल्या कोनोर यांनी २००० साली निवृत्ती स्वीकारली. त्या डावखुर्‍या संथगती गोलंदाज होत्या.

विशेष म्हणजे लॉर्डस् क्रिकेट मैदानाची मालकी असलेल्या एमसीसीने १९९८ सालापर्यंत आपले सदस्यत्व महिला खेळाडूंसाठी खुले केले नव्हते. त्यापूर्वी ब्रिटनची राणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय व काही महनीय स्त्रियांनाच लॉर्डस्‌च्या पॅव्हेलियनमध्ये प्रवेश दिला जात होता.