हवामान विभागाने राज्यात येत्या १६ सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तविली असून, ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वास्को ते वेंगुर्ला दरम्यान समुद्रात जोरदार लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
राज्यात मागील चोवीस तासात उत्तर आणि दक्षिण गोव्यातील सर्वच भागात पावसाची नोंद झाली. राज्यभरात चोवीस तासांत सुमारे २ इंच पावसाची नोंद झाली. राज्यात मोसमी पावसाने इंचाची शतक पूर्ण केले असून, आत्तापर्यंत १०१.८६ इंच पावसाची नोंद झाली आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात गेल्या पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. राज्यात मागील पाच दिवसांत साधारण सात इंच पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा मागील पाच दिवसांत जास्त पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात चोवीस तासांत वाळपई येथे सर्वाधिक ३.२१ इंच पावसाची नोंद झाली. पेडणे येथे २.९४ इंच, सांगे येथे २.६५ इंच, मडगाव २.६३ इंच, केपे येथे २.३६ इंच, साखळी येथे २.१८ इंच, दाबोळी येथे २.१० इंच, फोंडा येथे १.६८ इंच, म्हापसा येथे १.६५ इंच, जुने गोवे येथे १.४९ इंच, पणजी येथे १.०९ इंच, काणकोण येथे १.०४ इंच, मुरगाव येथे १.०२ इंच पावसाची नोंद झाली.
राज्यातील सात विभागात पावसाने इंचाची शंभरी पार केली आहे. त्यात वाळपई, पेडणे, सांगे, केपे, काणकोण, फोंडा आणि साखळी या भागांचा समावेश आहे. राज्यात आत्तापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद वाळपई येथे १३७.०७ इंच एवढी झाली आहे, तर सर्वांत कमी पावसाची नोंद मडगाव येथे ७९.४४ इंच एवढी झाली आहे.