राज्यात लवकरच 2 नव्या क्लस्टर युनिव्हर्सिटी

0
4

संपादकांशी वार्तालापावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सुतोवाच; महाविद्यालयांना विद्यापीठ संलग्नतेबाबत स्वातंत्र्य

नव्या शैक्षणिक धोरणाला अनुसरून गोवा विद्यापीठाबरोबरच राज्यात दोन नव्या क्लस्टर युनिव्हर्सिटी उभारल्या जातील आणि राज्यातील सर्व महाविद्यालयांना त्यांच्याशी संलग्नता मिळविण्याचे स्वातंत्र्य दिले जाईल, असे सूतोवाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल संपादकांशी झालेल्या वार्तालापावेळी केले.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार अनेक नवे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. हे नवे अभ्यासक्रम एक तर स्वयंपूर्ण स्वरूपात किंवा सरकारच्या मदतीने सुरू करता येतील. हे अभ्यासक्रम सुरू करताना ह्या महाविद्यालयांना आपल्याला हव्या त्या विद्यापीठाशी संलग्नता मिळवण्याचे स्वातंत्र्य दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सध्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाच्या आधारेच या नव्या विद्यापीठांचा कार्यभार हाताळला जाईल. गोवा विद्यापीठाप्रमाणेच या विद्यापीठांना कुलगुरू, कुलसचिव व परीक्षा नियंत्रक असतील, असे त्यांनी पुढे सांगितले.

उत्तर गोव्यासाठी क्लस्टर युनिव्हार्सिटी फर्मागुढी येथे, तर दक्षिण गोव्यासाठी केपे येथे ती उभारण्याचा सरकारचा विचार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ह्या दोन्ही नव्या विद्यापीठांना गोवा विद्यापीठाप्रमाणेच स्वायत्तता दिली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील गोवा व्यवस्थापन महाविद्यालयासारख्या काही महाविद्यालयांनी विद्यापीठ दर्जा मिळवण्याचा प्रयत्न चालवले असून, राज्य सरकार त्यावर विचार करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोवा सरकारने यापूर्वीच खासगी विद्यापीठ कायदा संमत केलेला असल्याने राज्य सरकारला ते अधिकार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

दोन खासगी विद्यापीठे गोव्यात येणार

पुणे येथील एमआयटी, पारूल युनिव्हार्सिटी आदी खासगी विद्यापीठे गोव्यात येत असून, साळगावकर यांचा ही खासगी विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मोप विमानतळापासून दरमहा 7 कोटींचा महसूल

सरकारला मोप विमानतळाचा महसुल मिळण्यास सुरुवात झाली असून, महिन्याला सात कोटी महसूल मिळत आहे. खनिज डंप लिलावातूनही सरकारला महसूल मिळाला आहे. खाणी नव्याने सुरू होतील त्यातूनही सरकारला भरीव महसुल मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मेट्रो आणण्याचा विचार : मुख्यमंत्री

राज्यात मेट्रो आणण्याचा सरकारचा विचार असल्याचे व त्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क साधण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्यातीत प्रमुख शहरे जोडण्यासाठी कशा प्रकारे मेट्रो आणता येईल, त्यावर सरकार विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.